आडवाटेने जाताना, रस्ता धुंडाळताना किंवा नव्या मार्गावरून प्रवास करताना तुम्हीही गुगल मॅपचा वापर करत असाल तर सावधान. गुगल मॅप किंवा GPS ची अचुकता चांगली असली तरी ती शंभर टक्के बरोबरच असेल याची शाश्वती नाही. GPS च्या विश्वासावर भर पावसात प्रवास करणाऱ्या दोन तरुण डॉक्टर मित्रांना प्राण गमवावा लागल्याची धक्कादायक घटना केरळच्या एर्नाकुलम येथे घडली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रात्रीच्या गडद अंधारात, मुसळधार पावसात अनोखळी रस्त्यावरून वैद्यकीय क्षेत्रातील पाचजण केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील गोथूरुथ विभागातून जात होते. डॉ. अद्वैत (२९) याचा शनिवारीच वाढदिवस होता. या वाढदिवसाची शॉपिंग करून ते कोचीहून कोडुन्गाल्लुर येथे परतत होते.

असा झाला अपघात

या प्रवासादरम्यान त्यांनी GPS सुरू केला होता. बाहेर गडद अंधार होता, तसंच मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. जलमय रस्त्यांवरून GPSच्या साहाय्याने ते परतत असताना भीषण अपघात झाला. GPS ने सरळ जाण्याचा मार्ग दाखवला. त्यानुसार, डॉ. अद्वैतने जलमय रस्त्यावरून गाडी सरळ चालवत नेली. परंतु, गाडी पाण्यात बुडत गेली. म्हणजेच, GPSने थेट नदीतून रस्ता दाखवला. त्यामुळे आधीच जलमय झालेले रस्ते आणि त्यात ओथंबून वाहणाऱ्या नदीत गाडी गेल्याने गाडीसह पाचजण बुडाले. यापैकी तिघांना आपला जीव वाचवता आला. तर, दोघांना जलसमाधी मिळाली. यामध्ये शनिवारी वाढदिवस असलेला डॉ. अद्वैत आणि डॉ. अजमल असिफ (२९) या दोघांचा समावेश आहे.

अपघातातून बचावलेल्या मित्राने काय सांगितलं?

“आम्ही जीपीएस वापरत होतो. मी गाडी चालवत नव्हतो, त्यामुळे जीपीएसमध्ये काही तांत्रिक अडचण आली की मानवनिर्मित अडचण होती याबाबत मला माहिती नाही”, असं गझिब थाबसीर याने सांगितलं. तो या अपघातातून बालंबाल बचावला आहे.

कोडुन्गल्लूरच्या CRAFT रुग्णालयात हे डॉक्टर कार्यरत होते. या रुग्णालयाचे वरिष्ठ व्यवस्थापक अशोक रवी म्हणाले की, “डॉ. अद्वैतच्या वाढदिवसानिमित्त आमच्या रुग्णालयातील काही डॉक्टर कोचीला सेलिब्रेशनसाठी गेले होते.”

मृत झालेला डॉ. अजलम हा थ्रिस्सूर जिल्ह्यातील तर, डॉ. अद्वैत हा कोल्लम जिल्ह्यातील आहे. जिस्मन, तमन्ना आणि थसबीर या अपघातातून बचावले आहेत. थसबीर हा CRAFT रुग्णालयात कार्डिओलॉजी विभागात कार्यरत आहे. तर, जिस्मन ही रुग्णालयात परिचारिका असून तमन्ना एमबीबीएसची विद्यार्थीनी आहे. या तिघांनाही कोचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

डॉ. अद्वैतचं पार्थिव कलमसेरी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलं आहे. तर, डॉ. अजमलचं पार्थिव थ्रिसुस्र मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gps misguides 2 young doctors to death in kerala ernakulam sgk