Allahabad High Court: बलात्कार प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी करत असताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण सध्या चर्चेत आहे. या निरीक्षणावर वाद होण्याची शक्यता आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी पवन आणि आकाश या दोन आरोपींवर खटला दाखल झाला. सुनावणी दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने म्हटले की, पीडितेच्या छातीला हात लावणे, पायजम्याची नाडी सोडणे आणि पीडितेला नाल्याखाली ओढण्याचा प्रयत्न करणे हा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसे नाही.

प्रकरण काय आहे?

उत्तर प्रदेशच्या कासगंज येथे पवन आणि आकाश या दोन आरोपींनी ११ वर्षीय अल्पवयीन पीडितेच्या छातीला हात लावला, तसेच तिच्या पायजम्याची नाडी तोडली, तसेच तिला नाल्याखाली ओढले. पण तिथून चालणाऱ्या काही लोकांनी आरोपींना हटकल्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला. २०२१ साली सदर प्रकरण घडले होते. आरोपींनी अल्पवयीन मुलीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

आरोपी पवन आणि आकाशवर भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ३७६ नुसार बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कासगंज येतील सत्र न्यायालयात त्यांच्याविरोधात सुनावणीही झाली. दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर न्यायाधीश राम मनोहर नारायण मिश्रा यांनी आरोपींविरोधात कलम ३५४ बी आणि पोक्सो कायद्याच्या कलम ९/१० नुसार गुन्हा दाखल करण्यास सांगितले.

उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने सांगितले की, आरोपी आकाश आणि पवन यांच्यावर लावलेले आरोप आणि प्रकरणात समोर आलेली तथ्ये बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा ठरविण्यासाठी पुरेसे नाहीत. बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप सिद्ध करण्यासाठी सरकारी वकिलांनी सदर प्रयत्न पुढपर्यंत गेल्याचे सिद्ध करायला हवे. गुन्ह्याची तयारी आणि गुन्हा करण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न यातला फरक लक्षात घेतला पाहिजे.

एकलपीठाचे न्यायाधीश पुढे असे म्हणाले की, रेकॉर्डवर असलेल्या पुराव्यावरून असे दिसून येत नाही की, आरोपी बलात्कार करण्याच्या विचारात होते. आकाशविरुद्ध आरोप आहे की, त्याने पीडितेला नाल्याखाली ओढण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या पायजम्याची नाडी तोडली. पण या कृत्यामुळे पीडिता विवस्त्र झाली, असे प्रत्यक्षदर्शींनी म्हटलेले नाही. तसेच आरोपींनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही.

Story img Loader