काश्मीरमध्ये सरकार स्थापनेवरून तिढा अजूनही कायम आहे. सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाने नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेसशी सरकार स्थापनेसाठी महाआघाडीचा पर्याय खुला असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यात स्थिर सरकार गरजेचे असल्याने अशा महाआघाडीचा पर्याय पडताळला जात असल्याचे पीडीपीचे प्रवक्ते नईम अख्तर यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीच अशा आघाडीची कल्पना पुढे आणल्याचे अख्तर यांनी सांगितले. ८७ सदस्य असलेल्या जम्मू व काश्मीर विधानसभेत पीडीपीचे सर्वाधिक २८ सदस्य आहेत, तर भाजपचे २५, नॅशनल कॉन्फरन्सचे १५, तर काँग्रेसचे १२ सदस्य आहेत. दोन प्रमुख पक्ष एकत्र आल्याशिवाय बहुमतासाठीचा ४४ जागांचा आकडा गाठणे अशक्य आहे. सरकार स्थापनेसाठी काँग्रेससह, नॅशनल कॉन्फरन्स व अपक्षांनी पीडीपीला पािठबा देऊ केला आहे.
राज्यपालांना बुधवारी भेटणार
सरकार स्थापनेसंदर्भात पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती या बुधवारी (३१ डिसेंबर) राज्यपाल एन.एन.वोरा यांची भेट घेणार आहेत. राज्यपालांनी शुक्रवारीच मुफ्ती यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष जुगल किशोर शर्मा यांना सरकार स्थापनेसंदर्भात चर्चेसाठी पत्र पाठवले होते. १९ जानेवारीपर्यंत लोकनियुक्त सरकारने पदभार स्वीकारला नाही, तर राज्यात राष्ट्रपती राजवट आणावी लागेल.
धर्मनिरपेक्ष सरकारला पाठिंबा
राज्यात धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन व्हावे यासाठी काँग्रेसने सकारात्मक भूमिका घेऊन पाठिंबा देऊ केला आहे. पीडीपीला सर्वाधिक जागा मिळाल्याने सरकार स्थापनेसाठी त्यांना कायदेशीर व नैतिक हक्क आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी व्यक्त केली.