भारतासमोर सध्या चलनफुगवटय़ाचे संकट आ वासून उभे आहे. त्यावर नियंत्रण मिळवणे हे भारताचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. त्यातच गेली काही वर्षे खोळंबलेल्या सुमारे ५० ते ७० अब्ज डॉलरच्या काही प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीला सरकारकडून चालना दिली जात आहे. त्यामुळे मोठे, व्यापक आणि भव्य बदल होण्यास अजूनही थोडा वेळ लागेल, असे प्रतिपादन रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले. हे प्रलंबित प्रकल्प मार्गी लागल्यास चलन फुगवटय़ावर नियंत्रण मिळवणे आणि आर्थिक उत्पन्नशी निगडित काही प्रश्नांची सोडवणूक करणे भारताला शक्य होईल, अशी माहितीही राजन यांनी या वेळी दिली.
लहानलहान बदलांमधूनच मोठे बदल घडतात, असे सांगत राजन यांनी भारतात भव्य बदल घडण्यास वेळ लागेल; मात्र त्यासाठी आवश्यक असलेल्या लहानलहान बदलांना सुरुवात झाली आहे, असे स्पष्ट केले. शिकागो येथे ‘भारत आणि जागतिक अर्थव्यवस्था’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात ते बोलत होते.
अल्पावधीत आणि अनेक क्षेत्रांत मोठे बदल घडावेत, अशी भारतातील अनेक नागरिकांचीही इच्छा आहे आणि विद्यमान सरकारही त्यांतील अनेक आघाडय़ांवर अत्यंत वेगाने मार्गक्रमण करीत आहे. अर्थव्यवस्थेचा विचार करता, तुम्हाला काही दिवसांतच त्याचे परिणाम दिसू लागतील, असा विश्वास राजन यांनी व्यक्त केला.
म्हणून वाटचाल प्रभावी..
नव्यानेच आलेल्या भाजपप्रणीत सरकारने मागील सरकारच्या काही योजना आणि काही धोरणे कायम राखली. मात्र त्यामुळे केंद्राच्या धोरणनिर्मितीत सातत्य असेल, असा संदेश जगभरात गेला, जो गरजेचा होता. त्यामुळेच अर्थव्यवस्थेला उभारी येण्यास मदत होईल, असे रघुराम राजन यांनी स्पष्ट केले.
घोषणा आणि प्रचारापेक्षा निकालांकडे लक्ष
सध्या प्रलंबित पण उपयुक्त आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने लाभदायी असलेल्या प्रकल्पांना चालना देणे ही सरकारची प्राथमिकता आहे. कदाचित यामुळे त्यांना वृत्तपत्रात प्रसिद्धी देणारे मथळे मिळवता येणार नाहीत, पण अर्थव्यवस्थेला त्याचे नक्कीच फायदे होतील, अशी खात्री राजन यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा