आजोबा आणि नातीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना छत्तीसगडमधील कोंडागाव येथे घडली आहे. एका ६५ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीने आपल्या चार वर्षीय नातीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पोलीस तपासात हा प्रकार उघडकीस आला असून संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आजोबाने आपल्या नातीवरच हे निर्दयी कृत्य केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मागील बुधवारपासून बेपत्ता होती. दुसऱ्यादिवशी तिचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या फरासगाव येथील एका छोट्या तलावात तरंगताना दिसला होता. हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. रामसू पटेल असे संशयित आरोपीचे नाव आहे. मुलगी बेपत्ता असताना आजोबानेही तिचा शोध घेण्याचे नाटक केले होते. मुलगी घराबाहेर खेळत होती. मी तिला अनेकवेळा आवाज दिला पण ती परतलीच नाही. तेव्हा मला ती गायब झाल्याचे लक्षात आले, संशयिताने मुलीच्या आई-वडिलांना सांगितले होते. नंतर पालकांनी पोलिसांकडे धाव घेऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रारी दिली होती.
परंतु, या कृत्यामागे त्या चिमुकलीचे आजोबाच असल्याची कोणालाच कल्पना नव्हती. श्वान पथकाने माग घेतला असता घटनास्थळावरून पोलिसांना आजोबाचे कपडे आढळून आले. संशयावरून पटेलला ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा मान्य केला व आपण दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे सांगितले.
मुलगी घराबाहेर खेळत असताना होती. तिला घरात बोलावून ती रडत असतानाही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिची हत्या केली. आपण पकडले जाऊ या भितीने त्याने त्या चिमुकलीचा मृतदेह सुकलेल्या गवताखाली लपवला आणि पालकांबरोबर तिचा शोध घेतला. गुरूवारी मध्यरात्री त्याने गवतातून मुलीचा मृतदेह काढून तो गावाजवळच्या तलावात टाकला.
एका मेंढपाळाला त्या तलावात एक छोट्या मुलीचा नग्नावस्थेतील मृतदेह तरंगताना दिसला. त्याने लगेच याची पोलिसांना माहिती दिली. मुलीचा मृतदेह घराबाहेर घेऊन जाताना आजोबाने त्याच्या कपड्यांनी तो झाकला होता. मृतदेह पाण्यात टाकल्यानंतर त्याने ते कपडे त्या परिसरात फेकून दिले होते. त्यावरून तो पकडला गेला.