आई-वडिलांच्या विरोधात जाऊन मुलीने लग्न केल्याने तिला तिचा जीव गमवावा लागला आहे. तिच्या वडील आणि भावानेच तिचा जीव घेतला. दिल्लीतील ग्रेटर नोएडा येथे हा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान, या प्रकरणी भावाला आणि वडिलांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

२३ वर्षीय नेहा मंगळवारी पहाटे लवकर उठली. त्या दिवशी प्रचंड उत्साही दिसत होती. कारण, तिचं तिच्या प्रियकराबरोबर लग्न होणार होतं. तिच्या शाळेतला मित्र सूरजबरोबर तिने लग्न करायचं ठरवलं होतं. शिवणकामाचे कपडे आणायला जाते असं सांगून ती घराबाहेर पडली अन् थेट ती कोर्टात गेली. अत्यंत साध्या पद्धतीने नेहा आणि सूरज या दोघांनी मंगळवारी (११ मार्च) लग्नगाठ बांधली.

पण त्यानंतर तासाभरातच गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. जन्मदात्या वडील आणि भावानेच तिची हत्या केली. ग्रेटर नोएडातील चिपियाना गावात हा प्रकार घडला. तर, बुधवारी सकाळी या तरुणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. याप्रकरणी भानू राठोड आणि हिमांशु राठोड यांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली. परवानगीशिवाय तिने लग्न केल्याने आई-वडिल नाराज होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

“बुधवारी सायंकाळी ६.४५ मिनिटांनी पोलिसांना एका आपत्कालीन क्रमांकावर फोन आला. सूरज नावाच्या व्यक्तीने हा फोन केला होता. तो म्हणाला की त्याच्या बायकोला तिच्या पालकांनी मारून टाकलं आहे”, अशी माहिती सेंट्रल नोएडाचे पोलीस उपायुक्त शक्ती मोहन अवस्थी यांनी ही माहिती दिली.

नेहा आजारी असल्याचं पोलिसांना सांगितलं

अवस्थी म्हणाले, सूरज (२३) ने दिलेल्या माहितीनुसार तो नेहाला बुधवारी सातत्याने फोन करत होता. पण त्याच्या फोनला कोणीही उत्तर देत नव्हतं. त्यामुळे त्याने तिच्या विभागातल्या एका व्यक्तीला फोन केला. पण नेहाचं निधन झाल्याची खबर त्याला मिळाली. त्यामुळे सूरजने थेट पोलिसांंशी संपर्क साधला अन् सूरजची तक्रार येताच बिसराख पोलीस ठाण्यातून पोलिसांचं पथक नेहाच्या घरी धडकलं. जेव्हा पोलीस घरी पोहोचले तेव्हा तिच्या कुटुंबाने सांगितलं की आजारपणामुळे नेहाचा मृत्यू झालाय आणि बुधवारी सकाळी सात वाजताच तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांना याप्रकरणी संशय आला. त्यामुळे पोलिसांनी वडिलांची आणि भावाची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान नेहाची गळा दाबून हत्या केल्याची माहिती त्यांनी दिली.

शाळेपासूनचं प्रेम

नेहा आणि सुरज लहानपणी एकाच विभागात राहत होते. दोघेही एकाच शाळेत होते. शाळेत असल्यापासून या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. दहावी झाल्यानंतर नेहाचं कुटुंब नोएडा येथे राहायला गेले. तरीही नेहा आणि सूरज एकमेकांच्या संपर्कात होते. या दोघांच्या प्रेमसंबंधांबाबत दोघांच्याही कुटुंबाला माहिती होती. सूरजच्या कुटुंबाने नेहाच्या घरी लग्नाचा प्रस्तावही ठेवला होता. परंतु, नेहाच्या कुटुंबाने या लग्नाला नकार दिला.

नेहा टेलरिंगचं काम करत होती. त्यामुळे मंगळवारी सकाळी शिवणकामासाठी कपडे आणायला जाते असं सांगून ती घरातून बाहेर पडली आणि थेट कोर्टात गेली. कोर्टात तिला आणि सूरजला तिच्या भावाच्या मित्राने पाहिलं. या मित्राने तत्काळ घरी येऊन तिच्या भावाला कल्पना दिली. त्यामुळे नेहाच्या भावाने लगेच तिला फोन करून घरी बोलावून घेतलं. घरी आल्यावर तिला याबाबत जाबही विचारला. त्यानंतर ती झोपलेली असताना तिच्या वडील आणि भावाने तिची गळा दाबू हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. तिने परवानगीशिवाय सूरजशी लग्न केलं, याचा तिच्या कुटुंबियांच्या मनात राग होता, म्हणून तिची हत्या केल्याची कबुली तिच्या वडिलांनी पोलिसांना दिली.