आजवर झालेल्या २० शिखर परिषदांना यंदा कमालीचे महत्त्व आले आहे. विविध क्षेत्रांतील सुमारे २५००० लोक इथे सहभागी झाल्यामुळे विस्तीर्ण क्षेत्राला गावाच स्वरूप आले आहे. यापूर्वीच्या परिषदांमध्ये राष्ट्रांचे प्रमुख अखेरीस येत असत. सहमती न झाल्यामुळे अंतिम मसुद्यासाठी परिषदा लांबत असत. यंदा मात्र ते आरंभी आल्यामुळे हवामान कराराच्या कच्च्या मसुद्यावर खल चालू आहे. तरीही शुक्रवारऐवजी रविवारी परिषदेचा समारोप होईल अशी चिन्ह दिसत आहेत. शेजारच्या पटांगणात फलक, पत्रक, गाणी, चित्र, नाटय़, लघुपट या माध्यमांतून कार्यकत्रे लोकभावना व्यक्त करीत आहेत. दोन्हीकडे भरगच्च कार्यक्रम चालू आहेत. याखेरीज शहरभर निदर्शने, मोच्रे व सभा घेतल्या जात आहेत. जेफ्री सॅक्स, नेओमी क्लायन, बिल मॅक किबन, जॉर्ज मॉनबायोट यांसारखे लेखक, नोबेल सन्मानित अल गोर, अर्थशास्त्रज्ञ सर निकोलस स्टर्न असे अनेक विषयांतील अग्रगण्य सहभागी झाले आहेत.
कर्ब उत्सर्जन कमी करणे, हरित ऊर्जा, हवामान समायोजन या सर्वाची सुरुवात शहर नियोजनापासून होते. वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर हा विचार रुजवला जातो. शहरांना कर्बरहित, हरित व सुंदर करण्यामध्ये फ्रान्स , स्वित्र्झलड, नॉर्वे, डेन्मार्क, जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांनी खूप काम केले आहे. मेक्सिको, कोलंबिया, ब्राझील या देशांमध्येही बकालपण दूर करून शहर सुंदर करण्याचे अथक प्रयत्न चालू आहेत.
घरातील स्वयंपाक, भांडे व कपडे धुणे, आहार या प्रत्येक कृतीतून किती ऊर्जा खर्च होते व त्यात कपात कशी करता येईल, याचे मार्गदर्शन शाळांपासून केले जात आहे. वीज, पाणी वाचवणे म्हणजे कार्बनच्या पाऊलखुणा कमी करणे आहे. प्रत्येक व्यक्तीने कर्ब उत्सर्जन कपात करावी यासाठी विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. पॅडल फिरवून बॅटरीत ऊर्जा भरण्याचे अनेक प्रयोग चालू आहेत. मोबाइल, लॅपटॉप, सीडी प्लेअर चालवण्यासाठी वा फळांचा रस काढण्याकरिता सायकल चालवतात. यातून व्यायामही आणि काम हे दोन्ही उद्देश साधले जातात. असे कित्येक नमुने प्रदर्शनात पाहायला मिळतात.
या शहरांमधून मोटारीवर दणकून कर, वाहनतळावर थांबवण्याकरिता भरपूर शुल्क, तसेच मध्यवर्ती भागात वाहनबंदी अशा उपायांनी मोटारवापर कमी केला आहे. या परिषदेच्या निमित्ताने बॅटरीवर चालणाऱ्या ५०० मोटारी रस्त्यावर आणल्या आहेत. दहा मिनिटे चालताच मेट्रो अथवा बस मिळतेच इतकी सार्वजनिक वाहतूक कार्यक्षम आहे. शहराच्या सर्व भागांत दुचाकींसाठी रस्त्यावर खास पट्टे राखून ठेवले आहेत. पादचारी व दुचाकीस्वार जात असल्यास चारचाकी वाहने थांबवून त्यांना पुढे जाऊ देतात.
हवा व ध्वनिप्रदूषणाचा लवलेश नसणारे प्रसन्न वातावरण, कस्पटसुद्धा दिसणार नाही, अशी कमालीची स्वच्छता, पाण्याचा पुनर्वापर, स्वच्छ ऊर्जेचा सर्रास वापर ही हरित शहरांची वैशिष्टय़े आहेत. या शहरांच्या रचनेसाठी वास्तुविशारदांचा सल्ला अंतिम असतो. तिकडे शहराचा कोपरान्कोपरा सुंदर करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात. नवीन बांधकामांचा वापर करताना ऊर्जेचा व पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी त्या दर्जाचे हरित नामांकन दिले जाते. कल्पकतेला वाव दिला तर नावीन्याचे धुमारे फुटतात. त्यांनी सार्वजनिक शौचालयांची पर्यावरणस्नेही संरचना केली आहे. या शहरांनी उत्तम शहरनियोजन करून पर्यटकांना खेचून आणलं आहे.
आपल्याकडे ‘स्मार्ट’ अथवा दिखाऊ चटपटीतपणाला तसेच उथळ खळखळाटाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. चकचकीत काचांच्या िभतीमध्ये उकाडा उत्पन्न करून तो घालवण्यासाठी वातानुकूल यंत्रणा बसवण्याच्या बिनडोक, खर्चीक डिझाइनला आपण ‘आधुनिकतेचं शिखर’ समजत आहोत. आपण, भौगोलिक व पर्यावरणीयदृष्टय़ा नालायक इमारतींनी शहरे वाढवत आहोत. पर्यावरण आणि विकास हे एकमेकांच्या विरोधातच असतात, असा समस्त नेत्यांचा व नोकरशहांचा ग्रह आहे. हे धोरणकत्रे नेहमीच परदेश दौऱ्यात तिकडील पर्यावरण आणि विकास यांचा समन्वय साधणारे प्रकल्प पाहतात. इकडे येऊन त्याचे गुणगान गातात. पुढे ये रे माझ्या.. नेते, अधिकारी व समाज एकमेकांवर दोषारोपण करण्यात धन्य होतात. त्यांची शहरे हरित तर आपल्या शहरांचा रंग..?
शहरं, हरित आणि रहित
आजवर झालेल्या २० शिखर परिषदांना यंदा कमालीचे महत्त्व आले आहे.
Written by रत्नाकर पवार
First published on: 11-12-2015 at 02:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green cities and climate