Amritsar Temple Grenade Attack: पंजाबच्या अमृतसरमधील खांडवाला येथे ठाकुरद्वारा मंदिरात स्फोट झाला आहे. शनिवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी ग्रेनेड फेकून घटनास्थळावरून पळ काढला. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. १४ मार्च रोजी रात्री १२.३५ च्या दरम्यान सदर हल्ला झाला. ज्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंह भुल्लर यांनी या हल्ल्यांमागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचा संशय व्यक्त केला.
पोलीस आयुक्त भुल्लर पुढे म्हणाले, काल मध्यरात्री हल्ला झाल्यानंतर मी घटनास्थळाची पाहणी केली होती. फॉरेन्सिक टीम पुरावे गोळा करण्याचे काम करत आहे. दोन आरोपी दुचाकीवरून आल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. लवकरच त्यांना आम्ही पकडू. पाकिस्तानमधून अशाप्रकारची नेहमीच आगळीक करण्यात येते. पाकिस्तानकडून भारतातील गरीब कुटुंबातील मुलांना फूस लावून चुकीचे काम करण्यासाठी प्रवृत्त केले जाते. माझे तरुणांना आवाहन आहे की, पैशाच्या लाभापोटी कुणीही आपले आयुष्य उध्वस्त करू नये.
मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, “काही समाजकंटकांकडून पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्याचे वारंवार प्रयत्न केले जातात. अमली पदार्थाची तस्करी हा त्यातलाच एक प्रकार आहे. मोगा येथे गेल्या काळात घडलेल्या घटनेचा पोलिसांनी छडा लावला होता. पंजाब पोलीस याही घटनेचा नक्कीच तपास करतील आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखतील.”
पाकिस्तानचा हात असल्याचा संशय व्यक्त करताना मुख्यमंत्री मान म्हणाले की, पाकिस्तान नेहमीच ड्रोनद्वारे पंजाबमधील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करत असतो. पंजाबमधील शांतता त्यांच्यासाठी सोयीची नाही.
पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग यांनीही ग्रेनेड हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. तसेच पंजाबमध्ये दहशत आणि असुरक्षित वातावरण निर्माण झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली.