Grenade attack at the house of Punjab BJP leader:पंजाबमधील जालंधर येथे ८ एप्रिल रोजी भाजपा नेते मनोरंजन कालिया यांच्या घरावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शनिवारी दुपारी आग्नेय दिल्लीतून एका १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी, सैदुल अमीन हा उत्तर प्रदेशातील अमरोहाचा रहिवासी असून, तो शुक्रवारी दिल्लीत दाखल झाला होता आणि जसोला येथील एका हॉटेलमध्ये लपून बसला होता, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

बाबा सिद्दीकींच्या हत्येमागील सूत्रधार

“अमीन हा महाराष्ट्रातील नेते बाबा सिद्दीकींच्या हत्येमागील सूत्रधार असलेल्या फरार जीशान अख्तरच्या सतत संपर्कात असतो. अख्तर हा अझरबैजान किंवा युरोपमधून काम करत असल्याचा संशय आहे,” असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

मनोरंजन कालिया यांच्या घरावरील हल्ल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पंजाबचे विशेष डीजीपी अर्पित शुक्ला म्हणाले होते की, तुरुंगात बंद असलेले गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा आणि पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी यांचा सहकारी झीशान अख्तर याचा या हल्ल्यामागे हात आहे.

दिल्ली पोलिसांच्या उत्तर रेंजच्या विशेष सेलच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, डीसीपी अमित कौशिक आणि एसीपी राहुल सिंग यांच्या देखरेखीखाली निरीक्षक रवी तुषिर व पूरण पंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारी पंजाब पोलीस कर्मचाऱ्यांसह हॉटेलवर छापा टाकला आणि अमीनला त्याच्या खोलीतून अटक केली.

ग्रेनेड फेकण्यासाठी ५०,००० रुपये

एका अधिकाऱ्याने सांगितले की, कालिया यांच्या घरावर हल्ला केल्यानंतर अमीनला त्याचा मोबाईल नष्ट करण्याचे आणि डोक्यावरील संपूर्ण केस कापण्यास सांगण्यात आले होते. “त्याला काही दिवस भूमिगत राहण्यास आणि दुसऱ्या कामाच्या सूचना मिळण्याची वाट पाहण्यास सांगण्यात आले होते. अमीनला इंस्टाग्रामद्वारे संपर्क साधून कालिया यांच्या घराबाहेर ग्रेनेड फेकण्यासाठी ५०,००० रुपये देण्यात आले होते. त्याला हे पैसे यूपीआयद्वारे वेगवेगळ्या खात्यांमधून हप्त्यांमध्ये देण्यात आले होते.”

यूट्यूब व्हिडिओ पाहून हल्ला

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अमीनला अमृतसरमधून ग्रेनेड घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. “त्याने १५०० रुपयांना ई-रिक्षा भाड्याने घेतली, कालियाच्या घराबाहेर ग्रेनेड फेकला आणि पळून गेला,” असे अधिकारी म्हणाला. पोलिसांमधील दुसऱ्या एका सूत्राने सांगितले की, ग्रेनेड कसे फेकायचे हे शिकण्यासाठी अमीनने यूट्यूब व्हिडिओ पाहिले होते.