राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. नवरदेवाला लग्न मंडपात वरात घेऊन येण्यास उशीर झाल्याच्या कारणातून नवरीनं वेगळ्याच एका तरुणाशी लग्न केलं आहे. नवरदेव मुलगा आणि त्याचे काही मित्र मद्यधुंद अवस्थेत लग्नाच्या वरातीत नृत्य करत होते. लग्नाचा मुहूर्त निघून जात असल्याने नवरीकडील मंडळींनी वरात लवकरात लवकर लग्नमंडपात घेऊन येण्याबाबत सांगितलं. पण नवरदेव मुलगा आपल्या काही मित्रांसमवेत मद्यधुंद अवस्थेत नाचत बसला.

त्यामुळे वरात लग्नमंडपात यायला काही तास उशीर झाला. दरम्यान वाट पाहायला लावल्यामुळे चिडलेल्या नवरीनं वरात परत पाठवण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याच लग्नमंडपात अन्य एका तरुणाशी विवाह केला. या धक्कादायक प्रकारानंतर नवरदेव मुलगा वधूकडील मंडळींवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. संबंधित घटना राजस्थानातील चुरू जिल्ह्याच्या राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेलाना गावात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी १५ मे रोजी सुनील नावाच्या तरुणाचं चेलाना येथील एका तरुणीशी विवाह होणार होता. पहाटे सव्वा एक वाजता लग्नाचे फेरे घेण्यासाठी शुभ मुहूर्त ठरवला होता. त्यासाठी नवरदेव आणि त्याचे नातेवाईक वधूच्या गावात आले होते. सर्वकाही ठरल्याप्रमाणे सुरू होतं. रात्री ९ वाजता नवरदेवाची वरात वधूच्या घराच्या दिशेनं निघाली होती. पण नवरदेव आणि त्याचे मित्र मद्यधुंद अवस्थेत डीजेच्या तालावर नाचत राहिले. त्यामुळे वरात मंडपात पोहोचायला बराच उशीर झाला.

वधूकडील नातेवाईकांनी नवरदेव मुलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तरीही तो माघार घेण्यास तयार झाला नाही. तो आपल्या मित्रांसोबत नाचत राहिला. त्यामुळे वधू पक्ष आणि वर पक्षात तणाव निर्माण झाला. या सर्व प्रकारामुळे चिडलेल्या नवरीनं लग्नाची वरात परत धाडण्याचा निर्णय घेतला आणि लग्नात आलेल्या एका दुसऱ्याच तरुणाशी लग्नगाठ बांधली. या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी नवरदेव आणि त्याचे नातेवाईक नवरीकडील मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी राजगड पोलीस ठाण्यात दाखल झाले.

नवरदेव आणि त्याचं कुटुंब लग्नाच्या फेऱ्यांबाबत बेजबाबदार पद्धतीने वागले. हीच वृत्ती भविष्यातही कायम राहील, यामुळे संबंधित निर्णय घेण्यात आल्याचा दावा वधू पक्षाकडील नातेवाईकांनी केला. त्यानंतर पोलिसांनी समुपदेशन केल्यानंतर हे प्रकरण मिटवलं.

Story img Loader