लग्न हा दोन कुटुंबातील आनंदाचा क्षण असतो. लग्न म्हटलं की, लग्न घरातील वातावरण अशरक्षः भारावलेले असते. लग्नाची धावपळ, खरेदी, विधी याची जुळवाजुळव करत भविष्याची स्वप्न पाहिली जातात. पण कधी कधी काही दुर्दैवी घटनांमुळे लग्नासारख्या आनंदाच्या क्षणाला गालबोट लागते. उत्तर प्रदेशच्या बिजनोर जिल्ह्यातील एका गावात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. नितू नावाचा २२ वर्षीय मुलगा लग्न होणार म्हणून आनंदात होता. त्याच्या लग्नाचे विधी चालू असताना तो अचानक जमिनीवर कोसळला आणि लग्नाच्या दिवशीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
लग्न सुरू असताना अचानक जमिनीवर कोसळल्यामुळे नातेवाईकांनी गोंधळ केला. काहींनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. नितूच्या कुटुंबियांनी सांगितले की, त्याची प्रकृती अतिशय ठणठणीत होती. त्याला याआधी कोणताही आजार नव्हता.
२६ एप्रिल रोजी नितूचे लग्न होते. त्याआधी प्रथा परंपरेनुसार विधी सुरू होते. लग्नाची मिरवणूक झाल्यानंतर नितून मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तिथेच तो अचानक कोसळला. त्याला तिथेचे सीपीआरही देण्यात आला. पण नितूने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याला जसपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नितूच्या जवळच असलेल्या चहरवाला गावातील तरुणीची त्याचे लग्न होणार होते. त्याच्या मृत्यूच्या बातमीमुळे दोन्ही गावावर एकच शोककळा पसरली. बिजनोरचे पोलीस अधिक्षक नीरज कुमार जदौन यांनी सांगितले की, मयत तरुणाच्या कुटुंबियांनी अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. मात्र आम्ही मृत्यूच्या कारणाचा तपास करत आहोत.