Groom Death in Sheopur : मध्य प्रदेशमधील श्योपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका लग्नाच्या वरातीत घोड्यावरून अचानक कोसळून वराचा मृत्यू झाला आहे. वराच्या मृत्यूनंतर लग्न सोहळ्यातील आनंदाचे रूपांतर शोकात झाले. मात्र, वराला हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नातेवाईकांनी वराला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं होतं. पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं. श्योपूर शहरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्येही नवरदेव घोड्यावर बसून डान्स करत असल्याचं दिसून येत आहे. लग्नाच्या मिरवणुकीतून लग्नासाठी मंडपाकडे जात असताना नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, श्योपूरमध्ये लग्न सोहळा सुरु होता. ठरल्याप्रमाणे लग्नासाठी वर घोड्यावर बसून आला. इकडे वधूही अलंकार घालून वराची वाट लग्न मंडपात पाहत होती. मात्र, दोघांची लग्नगाठ बांधण्यापूर्वीच वराचा अचानक मृत्यू झाला आणि वधू-वरांच्या कुटुंबीयांसमोर मोठी शोककळा पसरली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नवरदेव घोड्यावर बसून लग्नासाठी मंडपाकडे जात होता, पण यावेळी अचानक नवरदेव बेशुद्ध झाला. त्यानंतर आजूबाजूच्या कुटुंबीयांनी विचारपूस केली. पण नवरदेव काहीही बोलत नसल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी वराला मृत घोषित केलं.
दरम्यान, मृत्यूपूर्वी नवरदेव घोड्यावरून खाली उतरला आणि लग्नातील पाहुण्यांसोबत जोरदार नाचला होता असं आता सांगितलं जात आहे. पण त्यानंतर नवरदेव पुन्हा घोड्यावरून लग्नस्थळाकडे निघाला होता. यादरम्यान वराची तब्येत अचानक बिघडू लागली, लोकांना वाटले की तो नाचून थकला असेल. पण काही वेळातच वराचा श्वास थांबला. लग्नाआधीच वराचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण श्योपूर शहरातील लोकांना धक्का बसला. प्रदीप जाट असं मृताचे नाव आहे. वराच्या मृत्यूची बातमी दोन्ही कुटुंबात पोहोचताच लग्नसोहळ्यात मोठी शोककळा पसरली होती. येथे वराच्या मृत्यूची बातमी ऐकून वधूही बेशुद्ध झाली होती.