लग्नाच्या वरातीत डीजेवर गाणं लावण्यावरून वाद झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पण गाणं लावण्यावरून झालेल्या वादानंतर एका नवरदेवानं लग्नात आलेल्या पाहुण्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी नवरदेवाला पोलिसांनी अटक केली आहे. ऐन लग्नसोहळ्यात असा धक्कादायक प्रकार घडल्याने दोन्ही पक्षाकडील कुटुंबामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्याच्या शाहपूर येथील आहे. घटनेच्या दिवशी मंगळवारी लग्नाची वरात सुरू असताना डीजेवर लावलेल्या गाण्यावरून दोन गटात वाद झाला होता. यावेळी एका गटातील काही जणांनी डीजेवर सुरू असलेल्या गाण्यावर आक्षेप घेतला. दरम्यान संताप अनावर झाल्यानंतर नवरदेवानं थेट वाद घालणाऱ्या पाहुण्यावर गोळीबार केला.

या हल्ल्यात संबंधित पाहुणा गंभीर जखमी झाला. उपस्थित नातेवाईकांनी तातडीनं त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल होताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाहुण्याला मृत घोषित केलं. मृत पाहुणा हा वधू पक्षाकडून लग्नात आला होता, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल श्रीवास्तव यांनी दिली.

जफर अली असं मृत पावलेल्या पाहुण्याचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी नवरदेव इफ्तीखार याला अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर गावात मोठा तणाव निर्माण झाला आहे. दक्षता म्हणून पोलिसांनी गावात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

Story img Loader