Uttar Pradesh Crime News: लग्नांमध्ये अमक्याचा काका, तमक्याची आत्या, काकू, आजा, पणजा, दीर, भावजय किंवा अगदी गेला बाजार पोराटोरांमधलं कुणी ना कुणीतरी रुसून बसलेलं असतं आणि कुणी ना कुणी त्याची मनधरणी करत असतं! लग्नांमध्ये सामान्यपणे दिसणारं हे चित्र जरी प्रचलित असलं, तरी बहुतांशवेळी ते तात्कालिक ठरतं. कुणीतरी मध्यस्थी करून ‘समेट’ घडवून आणतं आणि लग्न सुखेनैव पार पडतं. पण उत्तर प्रदेशमधलं एक लग्न भलतंच चर्चेत आलंय. कारण या लग्नात चक्क नवरोबा रुसून मांडवातून निघून गेले आणि नंतर भलत्याच मुलीशी उरकला विवाह. या रुसण्याचं कारण ठरलं लग्नाच्या जेवणातल्या पोळ्या!
नेमकं झालं काय?
तर हा सगळा प्रकार घडला तो उत्तर प्रदेशच्या चंडौली जिल्ह्यात. जिल्ह्याच्या हमीदपूर गावात २२ डिसेंबरला एक विवाह ठरला होता. आमंत्रणानुसार दोन्ही बाजूची वऱ्हाडी मंडळी, सगेसोयरे आणि मित्रपरिवार हजर झाला होता. गावातलंच लग्न म्हटल्यावर गावकरीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एकीकडे लग्नाचे विधी चालू झाले आणि दुसरीकडे जेवणाच्या पंगती लागल्या. अचानक पंगतीमध्ये काहीतरी गोंधळ, आदळआपट आणि आरडाओरडा चालू झाला. नवरा मुलगा मेहताबला घडला प्रकार समजला. आपल्याकडची मंडळी जेवायला बसली असताना जेवणाच्या ताटात बराच वेळ पोळ्याच वाढल्या नाहीत हे ऐकून मेहताबचा पारा चढला. तसा मुलाकडेच्या मंडळींनाही राग अनावर झालाच होता.
मुलीकडच्या मंडळींनी तातडीनं व्याह्यांची, नवऱ्या मुलाची समजूत घालायचा प्रयत्न केला. त्यांची खूप मनधरणी केली. पण मुलाकडची मंडळी काही ऐकायला तयार नव्हती. शेवटी जवळपास सात महिन्यांपूर्वी ठरवलेलं लग्न ताटात पोळ्या वाढायला उशीर झाला हे कारण सांगत मोडून मुलाकडचं वऱ्हाड मांडव सोडून निघून गेलं.
भलत्याच मुलीशी विवाह, मुलीकडच्यांची पोलिसांत तक्रार
दरम्यान, मुलगा रात्री रागात लग्न मोडून निघून गेल्यानंतर त्यानं भलत्याच नात्यातल्याच एका मुलीशी लग्न उरकल्याचं इकडे मुलीकडच्यांना समजलं. हे ऐकून संतप्त झालेल्या यजमानांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि नवऱ्या मुलासह पाच जणांविरोधात तक्रार केली. लग्नासाठी खर्च केलेले ७ लाख रुपये, ज्यात हुंडा म्हणून मुलाला दिलेल्या दीड लाख रुपयांचाही समावेश होता, परत मिळावेत अशीही मागणी केली. मुलावर कायदेशीर कारवाई व्हावी अशीही विनंती केली. पण पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची तक्रार कुटुंबीयांकडून केली जात असून पुढील कायदेशीर पाऊल उचलण्याचा विचार कुटुंबाकडून केला जात आहे.