भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने बुधवारी संध्याकाळी GSLV-MK-III D2 या प्रक्षेपकाद्वारे GSAT-29 या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. जीएसएलएव्हीने संध्याकाळी ५.०८ मिनिटांनी जीसॅट-२९ उपग्रहासह अवकाशाच्या दिशेने उड्डाण केले.

आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन हे प्रक्षेपण झाले. जीसॅट-२९ला अवकाश कक्षेत सोडल्यानंतर इस्त्रोने मोहिम पूर्ण झाल्याचे टि्वट केले. जीएसएलव्ही भारताचे सर्वात वजनदार रॉकेट असून त्याला बाहुबली सुद्धा म्हटले जाते.

कुठल्याही अडथळयाविना हे प्रक्षेपण पार पडले. गाजा वादळामुळे हे उड्डाण लांबणीवर जाण्याची शक्यता होती. पण सुदैवाने नियोजित प्रक्षेपणात कुठलीही अडचण आली नाही. श्रीहरीकोटोवरुन झालेले हे ६७ वे प्रक्षेपण होते. जीसॅट-२९ हा भारताचा ३३ वा दळणवळण उपग्रह आहे.

जीसॅट-२९ उपग्रह ३,४२३ किलो वजनाचा आहे. या उपग्रहामुळे ईशान्य भारत आणि जम्मू-काश्मीरचे दुर्गम भाग इंटरनेट सुविधेने जोडता येतील. इस्त्रोचे अध्यक्ष के.सिवन यांनी ही माहिती दिली. त्यांनी यशस्वी प्रक्षेपणाबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.
GSLV-MK-III D2 भारताचे सर्वात वजनदार रॉकेट असून या रॉकेटचे वजन ६४१ टन आहे. प्रवाशांनी पूर्णपणे भरलेल्या पाच विमानांइतके हे वजन आहे. हे रॉकेट बनवायला भारतीय शास्त्रज्ञांना १५ वर्ष लागली. या रॉकेटच्या एका उड्डाणासाठी येणारा खर्च ३०० कोटी रुपये आहे.