जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू झाल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला वेग येणार आहे. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्याने कर भरण्याचे प्रमाण वाढेल, त्यामुळे देशाच्या महसुलात वाढ होईल आणि भारताची प्रगती होईल असे अमेरिकेतली रेटिंग एजन्सी मूडीजने म्हटले आहे. वस्तू आणि सेवा कर लागू केल्यामुळे प्रशासकीय सुधारणा होतील, महसूल वाढेल, कर चुकवण्याचे प्रमाण कमी होईल त्यामुळे आपोआपच भारती अर्थव्यवस्थेला वेग येईल असे याच एजन्सीचे उपाध्यक्ष विल्यम फोस्टर यांनी म्हटले आहे. आजवर देशाच्या महसुलात कमतरता होती, त्यामुळे देशाची आर्थिक प्रगती म्हणावी तशी होत नव्हती, मात्र आता वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतरच्या काळात महसुलाची कमतरता सरकारला भासणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतात याआधी विविध प्रकारचे कर भरावे लागत होते ते जाऊन आता एकच कर लागू झाल्याने अनेक अडचणी दूर होण्यास मदत होईल. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला काहीशी मरगळ आली होती, मात्र GST लागू झाल्याने ही दूर होईल आणि सामान्य जनतेसह सगळ्याच देशाचे भले होईल असेही मूडिजने म्हटले आहे. जीएसटी लागू झाल्याने, व्यवसाय आणि कारभारांमध्ये सुलभता येईल, तसेच अनेक उत्पादनांचा विकास दरही वाढण्यास हातभार लागेल, याचमुळे भारतात विदेशी गुंतवणूक होण्यासही मोठा हातभार लागेल असेही मूडिजने म्हटले आहे. भारतात १ जुलैपासून जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला आहे. ज्यामुळे १७ प्रकारचे कर आणि २३ प्रकारचे अधिभार रद्द झाले आहेत.

जीएसटीमुळे महागाई वाढेल असा जो काही समज होता तो चुकीचा आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी स्पष्ट केले आहे. अनेक उत्पादनांच्या किंमती कमी होणार आहेत, तर अनेक उत्पादनाच्या किंमती आहे त्याच राहतील, ज्यामुळे महागाई वाढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असेही जेटली यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर जीएसटी लागू झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला वर्षभरातून फक्त एकदाच रिटर्न भरावे लागतील, त्यानंतरचे रिटर्न संगणक प्रणालीद्वारे मिळवले जातील असेही जेटली यांनी स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gst will boos indian economy gdp says american rating agency moodys