एपी, कोनाक्रे (गिनिया)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण गिनियामधील फुटबॉलच्या स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी होऊन ५६ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले, अशी माहिती गिनियाच्या सरकारने सोमवारी दिली. प्रतिस्पर्धी संघांच्या चाहत्यांमध्ये संघर्ष होऊन झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लहान मुलांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

गिनियाचे दूरसंचारमंत्री फाना सौमाह यांनी राष्ट्रीय वाहिनीवरून एक निवेदन प्रसिद्ध करून सांगितले की, याप्रकरणी तपास केला जात असून चेंगराचेंगरीला कारणीभूत असलेल्यांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक माध्यमे आणि राजकीय पक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींवर उपचार केले जात आहेत.

हेही वाचा >>> संसदेतील कोंडीवर तोडगा; संविधानावरील चर्चेवर सर्वपक्षीय सहमती; आजपासून सुरळीत कामकाजाची अपेक्षा

गिनियाचे लष्करी नेते मामादी दौम्बुया यांच्या सन्मानार्थ नेझेरेकोर या शहरामध्ये लाबे आणि नेझेरेकोर या संघांदरम्यान आयोजित स्थानिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान रविवारी दुपारी ही घटना घडली असे गिनियाचे पंतप्रधान आमादु औरी बाह यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून सांगितले. स्थानिक माध्यमांनी असे वृत्त दिले आहे की, सामन्यादरम्यान एका पेनल्टीवरून गोंधळ निर्माण झाला, तो वाढत गेल्यानंतर प्रेक्षकांना शांत करण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. वादात सापडलेल्या पेनल्टीमुळे संतप्त चाहत्यांनी दगडफेक केली, असे वृत्त ‘मीडिया गिनिया’ या स्थानिक संकेतस्थळाने दिले आहे.

या घटनेच्या ध्वनिचित्रफिती प्रसिद्ध झाल्या आहेत. स्टेडियमच्या एका भागात बसलेल्या चाहत्यांनी पेनल्टीच्या मुद्द्यावरून आरडाओरडा आणि निदर्शने केली. गोंधळ इतका वाढला की प्रेक्षक मैदानात गेले. या गोंधळात बाहेर पडण्यासाठी लोक पळत होते, त्यांच्यापैकी अनेकांनी उंच कुंपणावरून उड्या मारल्या.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर विरोधी पक्षांच्या आघाडीने सरकारवर टीका केली आहे. ही स्पर्धा लष्करी नेते मामादी दौम्बुया यांच्या बेकायदा आणि अयोग्य राजकीय महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती, असा आरोप त्यांनी केला आहे. गिनियामध्ये २०२१पासून लष्कराचे राज्य आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guinea football tragedy 56 killed in stampede in guinea during soccer game zws