दिल्लीत काही दिवसांपूर्वी कंझावाला येथे घडलेल्या एका भीषण दुर्घटनेनंतर काल केशवनगर भागात तशाच प्रकारची दुर्घटना घडल्याचे समोर आले. दरम्यान, दिल्लीतील या घटनांप्रमाणेच गुजरातमध्येही एक भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. एक भरधाव कारने दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर दुचाकीस्वारास तब्बल १२ किलोमीटर पर्यंत फरपटत नेल्याचे समोर आले आहे.
गुजरात पोलिसांनी गुरुवारी सूरत येथे एका दुचाकी चालकास धडक देऊन हत्या केल्याबद्दल आणि वाहनाखाली घेत तब्बल १२ किलोमीटर पर्यंत फरपटत नेल्याच्या आरोपात एकास अटक केली आहे. या दुर्घटनेतील मृत व्यक्तीचे नाव सागर पाटील असल्याचे समोर आले असून, अपघात घडला तेव्हा ते पत्नीसह दुचाकीवरून जात होते.
कारचालकाने दुचाकीला जोरात धडक दिल्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला होता. तर महिलाचा मृतदेह घटनास्थळीच आढळला होता. मात्र धक्कादायक म्हणजे दुचाकीस्वार सागर पाटील यांचा मृतदेह अपघातस्थळापासून तब्बल १२ किलोमीटर अंतरावर आढळून आला.
या भयानक अपघानंतर आरोपी मुंबई आणि राजस्थानमध्ये जाऊन दडून बसला होता. मात्र गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला कामरेज टोल प्लाजा येथून सूरतमध्ये प्रवेश करताना अटक केली.
सूरत ग्रामीण पोलीस उपाधीक्षक इलेश पटेल यांनी माहिती देताना सांगितले की, दुर्घटना १८ डिसेंबर रोजी सूरतच्या बाहेर भाग पलसाना येथे घडली होती. आरोपीची ओळख बिरेन लदुमोर अहीर अशी समोर आली आहे. तो एक व्यावसायिक आहे. तर पोलीस अधीक्षक हितेश जयसर यांनी सांगितले की, आरोपीने म्हटले आहे की दुचाकीस्वार त्याच्या कारच्या खाली अडकलेला आहे, याची त्याल कल्पना नव्हती, तो दुर्घटनेनंतर घाबरल्यामुळे पळण्याचा प्रयत्न करत होता.