गुजरात दौऱयावर दाखल झालेले आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना उत्तर गुजरातमधील राधनपुर जिल्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
केजरीवाल गुजरातमध्ये दाखल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर ‘आप’कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यानंतर केजरीवालांच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये ‘रोड शो’ घेण्यात आला. देशात आचारसंहितेच्या घोषणेनंतरही केजरीवालांनी ‘रोड शो’ घेतला. तसेच ‘रोड शो’ परवानगी नसल्याने पोलिसांनी केजरीवालांचा ताफा रोखला. 
आचारसंहिता लागू झाल्यामुळे तसेच ‘रोड शो’परवानगी तपासण्यासाठी केवळ चौकशीसाठी केजरीवालांना ताब्यात घेण्यात आले होते असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने सांगितले. चौकशीनंतर केजरीवालांना सोडण्यात आले आहे. केजरीवालांच्या या ‘रोड शो’मुळे आजच लागू झालेल्या आचारसंहितेचा भंग ‘आप’कडून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. 
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यात केलेल्या विकासाची पुष्टी करण्यासाठी आपण गुजरातमध्ये आलो असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. अरविंद केजरीवाल सध्या गुजरात राज्याच्या चार दिवसांच्या दौ-यावर आहेत. गुजरातमध्ये रामराज्य असल्याचा दावा नेहमीच गुजरात सरकार आणि प्रसारमाध्यमांकडून करण्यात येतो. गुजरातमध्ये शिक्षण, आरोग्य सेवांचा चांगल्याप्रकारे विकास झाला असून, राज्यात कोणताही भ्रष्टाचार होत नसल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे. त्यामुळेच राज्यातील विकास ‘याचि देहि याचि डोळा’ पाहण्यासाठी आपण गुजरात दौ-यावर आलो असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

Story img Loader