गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर काँग्रेस आणि विशिष्ट समाजांमधील तरुण नेत्यांचे आव्हान आहे. मात्र या निवडणुकीत भाजपची संपूर्ण भिस्त पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आहे. त्यामुळेच भाजपच्या पाचपैकी चार व्हिडिओंमध्ये मोदींनाच केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. यानंतर आता भाजपने मोदीछेने (ModiCheNe) हा नवा हॅशटॅग सुरु केला आहे. ‘मोदी आहेत ना, मग गुजरात सुरक्षित आहे,’ असा संदेश भाजपने नव्या व्हिडिओमधून दिला आहे.

याआधी भाजपने ‘मी आहे विकास, मी आहे गुजरात’ अशी जाहिरात करुन काँग्रेसच्या टीकेला उत्तर दिले होते. ‘विकास वेडा झाला आहे,’ या काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने ‘मी आहे विकास,’ ही जाहिरात तयार केली होती. यानंतर आता भाजपकडून नवी जाहिरात करण्यात आली आहे. या जाहिरातीत अभिनेते मनोज जोशी पुस्तक विक्रेत्याच्या भूमिकेत दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये पुस्तकाच्या स्टॉलजवळ आलेले तीन तरुण त्यांच्या समाजाबद्दल तावातावाने बोलताना दिसत आहेत.

भाजपने या व्हिडिओमधून अप्रत्यक्षपणे पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेल, ओबीसी नेता अल्पेश ठाकोर आणि दलित नेता जिग्नेश मेवाणी यांच्यावर टीका केली आहे. यासाठी पुस्तक विक्रेते असलेल्या मनोज जोशी यांनी ‘फोडा आणि राज्य करा,’ या इंग्रजांच्या सत्ताकारणाच्या पद्धतीचे उदाहरण दिले आहे. ‘काँग्रेसने माधवसिंह सोळंकींच्या काळातही खामचा (क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि मुस्लिम) प्रयोग केला होता. निवडणूक जिंका, मग गुजरातची एकता पराभूत झाली तरी चालेल,’ अशा शब्दांमध्ये या व्हिडिओमधून काँग्रेसवर तोंडसुख घेतले आहे.

या संपूर्ण व्हिडिओमध्ये भाजपने फक्त पंतप्रधान मोदींच्या नावाचा उल्लेख केला आहे. ‘गुजराती माणूस भारताला जगातील सर्वोत्तम देश बनवणार,’ असा संदेश या व्हिडिओमधून देण्यात आला आहे. मंगळवारी हा व्हिडिओ भाजपकडून प्रसिद्ध करण्यात आला. आतापर्यंत हा व्हिडिओ ५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. मोदी पंतप्रधान म्हणून दिल्लीत गेल्यानंतरची पहिल्यांदाच गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Story img Loader