इस्लामिक स्टेट ऑफ खोरासन प्रांतचा भाग असल्याच्या संशयावरून ३२ वर्षीय सुमेराबनू मालेक या तरुणीला गुजरात एटीसएने अटक केली आहे. तिचा दहशतवादी संघटनांशी संबंध होता हे ऐकून तिच्या घरच्यांना धक्का बसला आहे. याप्रकरणी त्यांनी मुलीविरोधात संतापही व्यक्त केला.
सुमेरबानू २०२१ मध्ये तिच्या पतीपासून विभक्त झाली होती. तेव्हापासून ती तिच्या आईवडिलांकडे राहते. तिला दोन मुले असल्याचीही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी इंडियन एक्स्प्रेसने तिच्या वडिलांशी संपर्क साधला असता तिचे वडील म्हणाले की, “माझी मुलगी अशा कामांमध्ये गुंतली आहे हे मला माहित असतं तर मी तिला घरातून हाकलून लावलं असतं.”
सुमेरबानूला शुक्रवारी एटीएसने अटक केली. त्यावेळी श्रीनगरमधील तीन जणांना एटीएसने पोरबंदर येथून अटक केली होती. दक्षिण आणि मध्य आशियामध्ये सक्रिय असलेल्या इस्लामिक स्टेटशी संलग्न असलेल्या ISKP च्या मॉड्यूलचा भाग असल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. उबेद नासिर मीर, हनान हयात शॉल आणि मोहम्मद हाजीम शाह अशी या पोरबंदर येथून अटक केलेल्यांची नावे आहेत. इराणमार्गे अफगाणिस्तानात जाण्याचा त्यांचा कट होता. सोमवारी, ISKP सदस्य झुबेर अहमद मुन्शी, सुमेराबानूच्या संपर्कात होता, त्यालाही श्रीनगरमधून उचलण्यात आले आहे.
सुमेराबानूचे वडील राज्य सरकारचे निवृत्त अधिकारी आहेत. तिला दोन मुलंही आहेत. तिचा भाऊ रझिमने सांगितले की, “सुमेराबानूने तिच्या पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर लवकरच झुबेर अहमद मुन्शी याच्या प्रेमात पडली. ते दोघेही लग्न करतील असं आम्हाला वाटत होतं. मुन्शी तिला पैसेही पाठवत होता. परंतु, या पैशांविषयी आम्हाला काहीही माहिती नाही.” दरम्यान, पोरबंदर येथून अटक केलेल्या तिघांना ती ओळखत नसल्याचेही तिने सांगितले. “सुमेराबानू सोशल मीडियावर कट्टरपंथी झाली”, असा दावाही तिचे वडिल हनिफ यांनी केला.