गुजरात पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत ७५.३ किलो हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे. कच्छ जिल्ह्यामध्ये अदानी समुहाच्या मालकीच्या मुंद्रा बंदराजवळ आढळून आलेल्या एका कंटेनरमध्ये ३७६ कोटी ५० लाख रुपये किंमतीचे हे अमली पदार्थ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुजरात एटीएस आणि पंजाब पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकांनी या कंटेरनमध्ये संशयास्पद वस्तू असल्याच्या शक्यतेने केलेल्या छापेमारीमध्ये हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती गुजरातचे पोलीस महासंचालक आशिष भाटिया यांनी सांगितलं आहे.

नक्की पाहा >> Photos: अदानींच्या मुंद्रा बंदराजवळ सापडलं ३७६ कोटींचं हेरॉइन; कंटेनरमध्ये अमली पदार्थ लपवण्यासाठी तस्करांनी काय केलेलं पाहा

हा सर्व माल १३ मे रोजी मुंद्रा बंदरामध्ये दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील अजमान फ्री झोनमधून हा माल मुंद्रा बंदरामध्ये आणण्यात आल्याची माहिती समोर आलीय. हा माल पंजाबमध्ये पाठवण्यात येणार होता. या कंटेरनमधील अमली पदार्थ लपवण्यासाठी कार्डबोर्डचे पाईप वापरण्यात आले होते. हे पाईप कार्डबोर्डचे वाटू नयेत म्हणून त्यावर निळ्या रंगाचं प्लास्टिक लावून हेरॉइन लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असं पोलिसांनी सांगितलंय.

नक्की वाचा >> Gujrat Riots Case: सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना गुजरात पोलिसांकडून अटक; निर्दोष व्यक्तींना अडकवल्याचा आरोप

गुजरातमधील याच बंदरावरुन १५ सप्टेंबर २०२१ रोजी तीन हजार किलो अमली पदार्थ पकडले गेले होते. त्यावेळीही हे बंदर आणि या बंदराची मालकी असणारा अदानी समूह चांगलाच चर्चेत आला होता.