केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे देशभर संतापाची लाट उसळली होती. काँग्रेसनेही याविरोधात जोरदार भूमिका घेत संसद परिसरात आंदोलन छेडलं होतं. आता अहमदाबाद येथील बार काऊन्सिल ऑफ गुजरातचे सदस्य परेश वाघेला यांनी बीसीजीच्या सार्वजनिक कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. ३० डिसेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात अमित शाह यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. आंबेडकरांच्या अपमानाबद्दल शाह यांनी माफी न मागितल्यास कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा इशारा वाघेला यांनी दिलाय. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
गुजरातमध्ये कोणत्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत अमित शाह?
बीसीजीने ३० डिसेंबर रोजी अहमदाबात येथील सायन्स सिटीच्या विज्ञान भवनात बीसीजीत नव्याने नावनोंदणी झालेल्या वकिलांसाठी शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जवळपास सहा हजार वकिल शपथ घेणार आहेत.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना वाघेला म्हणाले, “ज्यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यघटना तयार करण्यात आली अशा व्यक्तीचा तुम्ही अपमान केलात आणि तीन दिवसांनंतरही माफी मागितली नाही. मग तुमची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून मी उपस्थित का राहावं?”
s
बीसीजीच्या अध्यक्षांची भूमिका काय?
y
तर, बीसीजीचे अध्यक्ष जे. जे. पटेल यांनी गैर राजकीय कार्यक्रमात राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. वाघेला शुद्ध काँग्रेसी आहेत. काँग्रेस कायदेशीर सेलचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या पत्नीनेही पालिकेची निवडणूक लढवली आहे. पण त्या हरल्या. राजकीय पार्श्वभूमीवर ते वाट्टेल तसा निषेध करू शकतात. पण बीसीजीच्या व्यासपीठावरून त्यांनी राजकारण करू नये. बीसीजी ही गुजरातच्या वकिलांची मूळ संस्था आहे. आमच्या विनंतीवरून अमित शाह येत आहेत. या कार्यक्रमात कोणीही राजकीय अजेंडा आणू नये. गुजरातच्या वकिलांचा हा कार्यक्रम आहे. बीसीजी ही एक गैरराजकीय संस्था आहे.
यावर वाघेला म्हणाले, मी दलित आणि आंबेडकरवादी म्हणून या कार्यक्रमावर बहिष्कार घालत आहे. त्याचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही. माझ्या भावना दुखावल्या गेल्याने मी हे जाहीर केले आहे.