वडील आयसीयूमध्ये दाखल झाल्याने आणि त्यांना वारंवार चक्कर येत असल्याने गुजरातमधल्या काँग्रेस उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली आहे. अहमदाबाद पूर्व भागाचे उमेदवार रोहन गुप्ता यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षातल्या काही जणांवर टीका केली आहे.
रोहन गुप्ता यांनी काय म्हटलं आहे?
“मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मी एका कार्यक्रमात होतो. मी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आजवर पक्षासाठी सांभाळल्या आहेत. १५ वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये आहे. अहमदाबादमध्ये निवडणूक चांगल्या पद्धतीने होईल असं वाटलं होतं. पक्ष कार्यकर्ते जागृत होतील असं वाटलं होतं. त्यामुळे मला खासदारकी लढवण्यास सांगितलं तेव्हा मी आनंद झालो होतो. बूथ मॅनेजमेंट आणि इतर तयारी आम्ही सुरु केली.”
निवडणुकीतून माघार घेणं माझ्यासाठी सोपं नव्हतं
“माझ्यासाठी निवडणुकीतून माघार घेणं सोपं नव्हतं. मला हे दाखवून द्यायचं होतं की मी ही निवडणूक जिंकू शकतो. प्रचार चांगला झाला असता तर मी जिंकूनही आलो असतो. माझे वडील तीन दिवसांपासून रुग्णालयात आहेत. त्यांची १५ वर्षांपूर्वी बायपास झाली. मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्या सहकाऱ्यांनीही त्यांना समजावलं पण त्यांनी ऐकलं नाही. मी एका कार्यक्रमात होतो तेव्हा मला फोन आला. मी काल वडिलांशी बोललो. मी त्यानंतर रुग्णालयात गेलो. तिथे माझा आणि माझ्या वडिलांचा थोडा वादही झाला. तू मला लिहून दे की निवडणुकीतून माघार घेतोय. तोपर्यंत त्यांनी माझं ऐकलंच नाही. शेवटी मला या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली.” असं रोहन गुप्ता यांनी म्हटलं आहे.
मी न लढण्याचा निर्णय घेतलाय याचा परिणाम माझ्या राजकीय कारकिर्दीवर होणार हे मला माहीत आहे. मात्र वडिलांसमोर मी काहीही बोलू शकलो नाही. मला माझ्या वडिलांपेक्षा काहीही महत्त्वाचं वाटलं नाही. असं रोहन गुप्ता यांनी म्हटलंय आणि या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आहे.