लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येथे काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष अंबरिश डेर यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. विशेष म्हणजे त्यांनी हा राजीनामा देऊन लवकरच भाजपात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. अंबरिश हे काँग्रेसचे गुजरातधील मोठे नेते आहेत.
पक्षातून ६ वर्षांसाठी केलं होतं निंलबित
डेर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या आधी गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शक्तिसिंह गोहील यांनी अंबरीश यांची सर्व पदांवरून हकालपट्टी करण्यात आल्याचे तसेच त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याचे जाहीर केले होते. गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी माजी आमदार डेर यांची भेट घेतल्यानंतर शक्तिसिंह यांनी लगेच डेर यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली होती.
भाजपात जाणार असल्याची केली घोषणा
पक्षातून निलंबित केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर डेर यांनी लगेच पत्रकार परिषद घेत भाजपात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. अयोध्येतील राम मंदिराला काँग्रेसच्या नेत्यांनी भेट न दिल्यामुळे मी हा निर्णय घेतल्याचे, डेर यांनी सांगितले. डेर हे याआधीही भाजपाचे सदस्य होते.
राजूला मतदारसंघाचे होते आमदार
दरम्यान डेर यांनी २०१७ ते २०२२ या काळात अमरेली जिल्ह्यातील राजूला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यांनी भाजपाचे बडे नेते हिरा सोळंकी यांचा पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डेर यांची २०२२ साली काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. २०२२ सालच्या निवडणुकीत पराभूत होऊनदेखील ते या पदावर कायम होते. कोणत्याही अपेक्षेविना मी भाजपात प्रवेश करणार आहे, असं त्यांनी सांगितलंय. भाजपानेही मला कोणतंही आश्वासन दिलेलं नाही, असं डेर म्हणाले आहेत.