भाजपा नेते आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांनी शुक्रवारी एका ठिकाणी केलेल्या वक्तव्यावरुन नवीन वाद निर्माण झालाय. संविधान, धर्मनिरपेक्षता आणि कायदा या गोष्टी हिंदू बहुसंख्यांक असतील तोपर्यंतच टीकतील असं मत पटेल यांनी व्यक्त केलं आहे. हिंदू समाज अल्पसंख्यांक झाल्यानंतर हे काहीच शिल्लक राहणार नाही असं पटेल म्हणाले आहेत. पटेल यांनी गांधीनंगरमधील भारत माता मंदिरमध्ये बोलताना हे वक्तव्य केलं आहे. गुजरातमधील हे भारतमातेचं पाहिलेच मंदिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

विश्व हिंदू परिषदच्या वतीने मूर्ति प्रतिष्ठापना महोत्सव आयोजित करण्यात आलाय. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या पटेल यांनी “देशामध्ये काही लोक संविधान, धर्मनिरपेक्षतेसंदर्भात बोलतात. मात्र आज तुम्ही हा व्हिडीओ रेकॉर्ड करायचा तर करा किंवा माझे शब्द लिहून ठेवा पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की जोपर्यंत हिंदू बहुसंख्यांक आहेत तोपर्यंतच संविधान, धर्मनिरपेक्षता आणि कायदा या गोष्टी भारतामध्ये अस्तित्वात असतील. ज्या दिवशी हिंदूंची संख्या कमी होईल आणि दुसऱ्यांची वाढू लागले तेव्हा धर्मनिरपेक्षता, लोकसभा, संविधान काहीच वाचणार नाही. सर्वकाही झुगारुन दिलं जाईल, गाडून टाकलं जाईल, काहीच शिल्लक राहणार नाही,” असं मत व्यक्त केलंय.

ते मुस्लीम देशभक्त…

गुजरातचे गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा यांच्यासहीत विहिप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना “मी सरसकट सर्वांबद्दल हे वक्तव्य करत नाही. मला हे सांगावेसे वाटतेय की लाखो मुस्लीमही देशभक्त आहेत. लाखे ईसाई देशभक्त आहेत. गुजरात पोलीस दलामध्ये हजारो मुस्लीम आहेत ते सर्वच देशभक्त आहेत,” असं म्हटलं.

नवीन कायद्याबद्दल केलं भाष्य…

उपमुख्यमंत्र्यांनी राज्यामधील वादग्रस्त धर्मांतरविरोधी कायदा म्हणजेच गुजरात फ्रीडम ऑफ रिलिजन अधिनियम २०२१ बद्दलही मत व्यक्त केलं. सरकारने हा कायदा विवाहच्या माध्यमातून जबरदस्तीने होणारं धर्मांतर रोखण्यासाठी बनवल्याचं सांगितलं होतं. हा कायदा संविधानाच्या चौकटीमध्ये बसत नसल्याचं सांगत अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यानंतर उच्च न्यायलयाने संविधानातील काही कलमांच्या आधारे हा कायदा लागू करण्यावर तात्पुरती स्थगिती आणलीय. गुजरात सरकारने या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायलयात जाणार असल्याचं म्हटलं आहे.

हिंदू मुलालाही शिक्षा होणार…

पटेल यांनी आपल्याला या अधिनियमाविरोधातील याचिका एका संघटनेनं दाखल केल्याचं समजल्याचं सांगितलं. त्यांनी या संघटनेला कार्यक्रमामधील भाषणादरम्यान प्रश्न विचारला. जर हिंदू मुली हिंदू मुलांशी, मुस्लीम मुली मुस्लीम मुलांशी आणि शीख मुली शीख मुलांशी लग्न करत असतील तर यात अडचण काय आहे? मी इथे स्पष्ट करुन इच्छितो की एखाद्या हिंदू मुलाने निर्दोष मुस्लीम मुलीची फसवणूक करुन तिच्याशी लग्न केलं तर त्यालाही हा कायदा लागू होईल. या कायद्यामध्ये कोणत्याही धर्माला विशेषाधिकार देण्यात आलेले नाहीत, असं पटेल म्हणाले.

Story img Loader