गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे असून, काँग्रेसने सत्ताधाऱ्यांविरोधात बिहारच्या धर्तीवर महाआघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, संयुक्त जनता दलाचे बंडखोर आमदार छोटू वासवा, दलित समाजाचे नेते जिग्नेश मेवानी यांना आघाडीत सामील करुन घेण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरु केल्याचे समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात होणारी निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. तर सरकारविरोधी लाटेचा फायदा घेऊन भाजपचा पराभव करण्याचे मनसुबे काँग्रेसने रचले आहेत. बिहारच्या धर्तीवर गुजरातमध्येही भाजपविरोधात महाआघाडी स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेसने संयुक्त जनता दलाचे बंडखोर आमदार छोटू वासवा यांच्याशी चर्चा सुरु केली आहे. राज्यसभा निवडणुकीत छोटू वासवा यांनी भाजपऐवजी काँग्रेसचे अहमद पटेल यांना मतदान केले होते. वासवा हे जदयूचा गुजरातमधील चेहरा असून, आदिवासी समाजाचे नेते म्हणून ते ओळखले जातात. वासवा हे शरद यादव गटातील असून, लवकरच ते महाआघाडीबाबत काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करतील असे समजते.

संयुक्त जनता दलाच्या आमदारासह पाटीदार समाजाचे नेतृत्त्व करणाऱ्या हार्दिक पटेल यांचाही महाआघाडीत समावेश होण्याची शक्यता आहे. याशिवाय दलित चळवळीतील नेते जिग्नेश मेवानी, ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकूर यांचीदेखील काँग्रेससोबत चर्चा सुरु असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गुजरातमध्येही महाआघाडी झाल्यास भाजपसाठी ही निवडणूक सोपी नसेल असे जाणकारांचे मत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुजरात दौरे वाढले असून, राहुल गांधीही गुजरातकडे लक्ष देत आहेत. दिवाळीनंतर राहुल गांधी यांच्या गुजरात दौऱ्यातील तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे राहुल गांधींच्या सभांना गुजरातमध्ये अनपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat election 2017 rahul gandhi congress grand alliance jdu chhotu vasava patidar leader hardik patel take on bjp