गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी १ आणि ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. गुजरातमध्ये तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्षचा ( आप ) अंतिम टप्प्यातील प्रचाराचा धूमधडाका सुरु आहे. त्यात सुरतमध्ये प्रचार करत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या रोड शोवर दगडफेक करण्यात आली आहे.
सुरतमधील कटरगाम परिसरात अरविंद केजरीवाल रोड शो करत होते. तेव्हा अरविंद केजरीवाल यांच्या रोड शोवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, पोलिसांनी कोणतीही दगडफेक झाली नसल्याची माहिती दिली आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर हल्लाबोल केला.
हेही वाचा : हायकोर्ट नगर रचनाकार आहे का? सर्वोच्च न्यायालयाची उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती
“रोड शो जात असताना आमच्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. गेल्या २७ वर्षात काम केलं असते, तर दगडफेक करण्याची गरज पडली नसती. आप हा इमानदार आणि देशभक्त लोकांचा पक्ष आहे. आम्ही गुजरातमधील जनतेचे वीजबिल माफ करु. तुमच्या मुलांसाठी शाळा बांधू. पण, तुम्हाला सत्तेचा गैरवापर करायचा असेल, तर भाजपाबरोबर जावा,” असेही दगडफेक करणाऱ्यांना केजरीवाल यांनी म्हटलं.