गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर, ८ डिसेंबरला गुजरात निवडणुकीचे निकाल हाती येतील. यासाठी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. मात्र, काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांचा या यादीत समावेश नसल्याचं समोर आलं आहे.
काँग्रेसने मंगळवारी ( १६ नोव्हेंबर ) स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरुद्ध लढलेल्या शशी थरुर यांचा समावेश करण्यात आला नाही. काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयुआयने देखील शशी थरुर यांना गुजरात निवडणुकीत प्रचारासाठी निमंत्रित केलं होतं. पण, थरुर यांनी प्रचाराला जाण्यास नकार दिल्याचं समोर आलं आहे. तर, शशी थरुर यापूर्वी स्टार प्रचारकांच्या यादीच कधीच नव्हते, असे काँग्रेमधील सूत्रांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे शशी थरुर यांना काँग्रेस अध्यक्षपदासाठीची निवडणूक भोवल्याचं दिसत आहे.
हेही वाचा : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आफताब झालेला जखमी? उपचार करणारे डॉक्टर म्हणाले, “तो मे महिन्यात…”
दरम्यान, गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग, माजी मुख्यमंत्री कमलनाथ, माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुड्डा आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा प्रामुख्याने समावेश आहे.