गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागांचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. सलग सातव्यांदा भाजपाची गुजरातमध्ये सत्ता स्थापन होणार आहे. भाजपाला १५६ जागांवर विजय मिळाला आहे. तर, काँग्रेसची घसरगुंडी झाली असून, २०१७ पेक्षा अपेक्षित कामगिरी करता आली नाही. २०१७ साली काँग्रेसचा ७७ जागांवर विजय झाला होता. मात्र, यंदा केवळ १७ जागांवर काँग्रेसला समाधान मानावं लागलं आहे.
गुजरात निवडणुकीत सर्वांच्या नजरा होत्या, त्या तीन युवा नेत्यांवर. त्यात हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवानींचा समावेश आहे. २०१७ साली हे तीन युवा नेते भाजपासाठी डोकेदुखी बनले होते. पण, यंदा अल्पेश आणि हार्दिक यांनी भाजपात प्रवेश केला. तर, जिग्नेशने काँग्रेसच्या तिकीटावर आपलं नशीब आजमावलं होतं.
हेही वाचा : हिमाचल प्रदेशमध्ये लोकप्रिय घोषणांनी काँग्रेसला तारले; प्रियंका गांधींच्या प्रचाराला पहिल्यांदाच यश
हार्दिक पटेल
पाटीदार आरक्षण आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या हार्दिक पटेलने काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला हात दाखवत भाजपात प्रवेश केला होता. हार्दिकने आपल्या घरगुती मैदान असलेल्या विरमगाम येथून निवडणूक लढवली होती. यामध्ये हार्दिक विजयी झाला आहे. हार्दिकने काँग्रेसचे विद्यमान आमदार लाखाभाई भरवाड आणि आपचे उमेदवार अमरसिंह ठाकोर यांचा पराभव केला आहे. हार्दिकला ९८ हजार ६२७ मते मिळाली आहे.
अल्पेश ठाकूर
गुजरात क्षत्रिय ठाकूर सेना संघटनेच्या माध्यमातून अल्पेश ठाकूर यांची ओळख राज्यात निर्माण झाली होती. अल्पेश ठाकूर यांनी भाजपाच्या तिकीटावर दक्षिण गांधीनगर मधून निवडणूक लढवली होती. यामध्ये १ लाख ३३ हजार ३३९ मते पडली आहे. अल्पेश ठाकूर यांनी काँग्रेसचे हिमांशू पटेल यांचा पराभव केला आहे.
२०१७ साली अल्पेश ठाकूर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर राधनपूर मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, त्यांनी २०१९ साली भाजपात प्रवेश केला. २०१९ साली पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता अल्पेश ठाकूर यांना भाजपाने दक्षिण गांधीनगर मधून तिकीट दिलं होतं. त्यात ठाकूर यांचा विजय झाला आहे.
हेही वाचा : मैनपुरीमध्ये सपाचा बोलबाला! अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव २ लाख ८८ हजार मतांच्या फरकाने विजयी
जिग्नेश मेवानी
जिग्नेश मेवानी हे गुजरातमधील दलित समाजाचा प्रमुख चेहरा मानले जातात. जिग्नेश मेवानी यांनी वडगाम मतदारसंघातून दुसऱ्यांदा आणि काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. जिग्नेश मेवानी यांना ९३ हजार ८४८ मते पडली आहेत. मणिलाल वाघेला यांना मेवानींनी हारवलं आहे. जिग्नेश मेवानी हे राहुल गांधी यांचे जवळील व्यक्ती मानले जातात.