महाराष्ट्रातील २०१८ सालातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्रातील विविध भागाच्या पर्यटन विकासासाठी १ हजार कोटींच्या निधींची तरतूद करण्यात आली होती. यामध्ये सिंधुदुर्गात देशातील पहिली पाणबुडी उपलब्ध करून देण्यात येणार होती. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथे समुद्रविश्व पाहण्यासाठी हा प्रकल्प राज्य शासन राबवणार होता. परंतु, हा प्रकल्प आता गुजरातच्या द्वारका येथे होणार आहे. यासाठी गुजरात सरकारने माझगाव डॉक लिमिटेडसह करार केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुजरातला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमात होणार अधिकृत घोषणा
हिंदू पौराणिक कथांमध्ये या स्थानाला खूप महत्त्व आहे. कारण ते भगवान श्रीकृष्णाने निर्माण केलं आहे. १० जानेवीर २०२४ पासून गांधीनगर येथे होणाऱ्या आगामी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये पाणबुडी पर्यटन प्रकल्पाबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >> देशातील प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांना परदेशांत मागणी
माझगाव डॉकसह करार
गुजरात सरकार आणि MDL यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुमारे ३५ टन वजनाची आणि ३० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणारी पाणबुडी विकसित करण्यात येणार आहे. या पाणबुडीमध्ये २४ प्रवासी दोन रांगेत बसतील आणि प्रत्येक सीटला विंडो सीट असेल. जेणेकरून समुद्रात ३०० फूट खोलीवरून समुद्राचं नैसर्गिक सौंदर्य अनुभवता येईल.
करार झाला पण…
याबाबत माहिती देताना MLD चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल म्हणाले, सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली असली तरी राज्य सरकारच्या अंतिम निर्णयानंतरच पाणबुडीचे बांधकाम सुरू होईल. आम्ही गुजरात सरकारबोरबर सामंजस्य करार केला आहे. सध्या हा प्रकल्प कराराच्या पातळीवरच आहे. याबाबत अंतिम निर्णय होत नाही तोवर आम्ही पाणबुडीच्या बांधकामास पुढे जाऊ शकत नाही.
दिवाळीपर्यंत येणार पाणबुडी?
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, पाणबुडी २०२४ च्या दिवाळीपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. गुजरात टुरिझमचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पारधी इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले, हा एक वेगळा प्रकल्प आहे. जो शहरातील पर्यटनाला महत्त्वपूर्ण चालना देईल.
द्वारकेतील पर्यटन वाढणार
द्वारकेला धार्मिक महत्त्व असल्याने दरवर्षी येथे पर्यटकांची गर्दी असते. प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर हे हिंदुंसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे पाणबुडी प्रकल्प सुरू झाल्यास येथे पर्यटनाला चांगली चालना मिळू शकते.