पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी नर्मदा नदी पात्रात उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळयाचे लोकार्पण केले. सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारतीय राजकारणातील योगदान लक्षात घेऊन या पुतळयाला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असे नाव देण्यात आले आहे. या भव्य पुतळयाच्याखाली एका सफेद रंगाच्या पाटीवर देशी-विदेशी भाषांमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ लिहिले आहे. यात वेगवेगळया भारतीय भाषा सुद्धा आहेत. पण या भाषांमध्ये तुम्हाला मराठी भाषा दिसणार नाही.
वास्तविक महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन शेजारी राज्य आहेत. पण गुजरात प्रशासनाला मराठी भाषेचा विसर पडल्याचे दिसत आहे. या पाटीवर एकूण दहा भाषा आहेत. १८२ मीटर उंचीचा सरदार पटेल यांचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४३ वी जयंती आहे. त्याचेच औचित्य साधत या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.
पर्यटनाच्या दृष्टीने या स्मारकाला विकसित येणार असून इथे येणाऱ्या पर्यटकांना सरदार पटेलांचे जीवन आणि कार्याची माहिती देण्यात येणार आहे. देशाचे पहिले गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी वेगवेगळया संस्थानांमध्ये विभागलेल्या भारताला एकत्र करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा भव्य पुतळा साकारताना एका मराठमोळया शिल्पकाराने महत्वाचे योगदान दिले आहे तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात शिवाजी महाराजांसारखे शौर्य आहे असेही मोदी स्वत: म्हणाले. पण प्रत्यक्षात या पुतळयाच्याखाली देश-विदेशातील भाषा लिहिताना मराठी भाषेचा विसर पडला आहे.