देशभरातील तुरुंगात असलेल्या मुस्लिम कैंद्यांपैकी एक तृतियांश कैदी एकट्या गुजरातमध्ये आहेत, असे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गृह मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीवरून हा खुलासा झाला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

या आकडेवारीनुसार भारतात ८२१९० मुसलमान तुरुंगात आणि पोलीस कोठडीत कैद आहेत. यातील २१,५५० जणांना न्यायालयाने दोषी ठरवले असून, ते त्यांची शिक्षा भोगत आहेत. ५९५५० कच्चे कैदी असून, ६५८ जण पोलीस कोठडीत आहेत. गुजरात राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ५८.६ लाख नागरीक मुसलमान आहेत. हे प्रमाण गुजरातच्या एकूण लोकसंख्येच्या ९.७ टक्के इतके आहे. देशातील एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या ३.४ टक्के मुसलमान गुजरातमध्ये राहतात. तर त्याच राज्यातील एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या ३६.५ टक्के तुरुंगात असल्याचेही आकडेवारीवरून दिसते.

गुजरातनंतर दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचा क्रमांक लागतो. तमिळनाडूमध्येही तेथील एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या तुलनेत कैदेत असलेल्या मुस्लिमांची संख्या व्यस्त प्रमाणात आहे.