आरक्षणाच्या मागणीसाठी पटेल समाजाचे नेतृत्त्व करणारा हार्दिक पटेल कुठे आहे, याचा शोध घ्यावा असे तोंडी आदेश गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी रात्री गुजरात पोलीसांना दिले. त्याचबरोबर या विषयावरून राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आली. या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणीसाठी मंगळवारी रात्री न्यायालयाचे दरवाजे उघडण्यात आले आणि सुनावणी करण्यात आली.
हार्दिक पटेल याला पोलीसांनी बेकायदा अटक केली असून, त्याच्या जीवाला धोका आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला. त्यावर न्यायमूर्ती एम. आर. शहा यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी झाली. सुमारे एक तास न्यायालयाने याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतल्यावर राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आली. आणि २४ सप्टेंबरपर्यंत त्यावर उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचबरोबर पोलीसांना तातडीने हार्दिक पटेलचा शोध घेण्याचे तोंडी आदेश देण्यात आले. राज्यातील प्रत्येक नागरिकाचा जीव मोलाचा आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
पाटीदार अनामत आंदोलन समितीचे कार्यकर्ते केतन पटेल आणि दिनेश पटेल यांनी ही याचिका केली आहे. रात्री तीनच्या सुमारास या याचिकेवरील सुनावणी संपली. त्यानंतर याचिकाकर्त्यांचे वकील बी. एम. मंगुकिया यांनी माध्यमांना माहिती दिली.

Story img Loader