२०१४ साली निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आम आदमी पक्षाच्या एका कार्यकर्त्यांने केलेली याचिका फेटाळून लावण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश योग्य ठरवून गुजरात उच्च न्यायालयाने तो कायम ठेवला आहे.
याचिका फेटाळून लावताना संबंधित दंडाधिकाऱ्यांनी योग्य त्या प्रक्रियेचे पालन केले नाही हे याचिकाकर्त्यांचे म्हणणे नाकारून न्या. जे. बी. पारडीवाला यांनी दंडाधिकाऱ्यांचा आदेश उचलून धरला. दंडाधिकाऱ्यांना ही याचिका फेटाळून लावण्याचा अधिकार असून, त्यांनी हे योग्य पद्धतीने केले आहे. त्यामुळे आपण ही याचिका फेटाळत असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले. गेल्या वर्षी ३० एप्रिल रोजी गुजरातमध्ये २६ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू असताना भाजपचे तत्कालीन पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये मतदान केल्यानंतर लगेच पत्रकार परिषदेला संबोधित केले व त्यांच्या पक्षाचे ‘कमळ’ हे निवडणूक चिन्ह दाखवले. यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचे सांगून ‘आप’चे कार्यकर्ते निशांत वर्मा यांनी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी दंडाधिकाऱ्यांकडे केली होती. तथापि दंडाधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावल्यामुळे वर्मा यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते.

 

Story img Loader