देशद्रोहाच्या आरोपाखाली आपल्याविरुद्ध दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यात यावेत अशी विनंती करणाऱ्या पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल व इतर पाचजणांच्या याचिकेवरील सुनावणी सोमवारी पूर्ण केल्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. देशद्रोह आणि सरकारविरुद्ध युद्ध पुकारणेअशा गंभीर आरोपांखाली शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने हार्दिक पटेल, केतन पटेल, चिराग पटेल, दिनेश पटेल, अल्पेश कथिरिया व अमरिश पटेल यांच्याविरुद्ध जो एफआयआर दाखल केला आहे, तो रद्द करण्याची या सर्वाची मागणी आहे. या सहाजणांविरुद्धचा गुन्हा पोलिसांनी पकडलेल्या भ्रमणध्वनी संभाषणांवर आधारित आहे. जुलै ते सप्टेंबर महिन्यांदरम्यान गुन्हे शाखेने या पटेल नेत्यांनी केलेले २०० हून अधिक कॉल्स रेकॉर्ड केले असल्याचे सरकारी वकिलांनी न्या. जे.बी. पारडीवाला यांच्या न्यायालयाला सांगितले.

Story img Loader