पीटीआय, अहमदाबाद
गुजरात विद्यापीठात नमाज अदा करणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याच्या प्रकरणाची स्वत:हून दखल घ्यावी अशी एका वकिलाची विनंती गुजरात उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. ‘‘आम्हाला तपास संस्था करू नका’’, असे न्यायालयाने या वकिलाला सांगितले.
हे प्रकरणी पोलीस हाताळतील, आम्ही पोलीस निरीक्षक नाही असे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुनीता अग्रवाल आणि न्या. अनिरुद्ध पी मायी यांच्या खंडपीठाने यावेळी नमूद केले. शहरात घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगासाठी जनहित याचिका दाखल करण्याची गरज नाही अशी भूमिका यावेळी न्यायालयाने घेतली. ‘‘न्याय मिळावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत, पण आम्हाला तपास संस्था करू नका. आम्ही तसे करणार नाही. आम्ही घटनात्मक न्यायालये आहोत याचे आम्ही स्वत:लाच स्मरण करून देत आहोत. अशा प्रकारचे प्रकरण आमच्यासमोर आले तर आम्ही नक्कीच त्याची दखल घेऊ, पण हे प्रकरण त्यापैकी नाही’’, असे न्या. अग्रवाल यांनी स्पष्ट केले. वकील के आर कोष्टी यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घ्यावी अशी विनंती केली होती.
हेही वाचा >>>‘शक्ती’वरून कलगीतुरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेवर राहुल गांधींचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, “मी जेव्हा जेव्हा…”
आतापर्यंत पाचजणांना अटक
विद्यार्थ्यांवर हल्ला प्रकरणी आतापर्यंत पाचजणांना अटक करण्यात आली आहे. हल्ला झालेल्या परदेशी विद्यार्थ्यांला नवीन विंगमध्ये स्थलांतरित करण्याचा आणि तसेच सुरक्षा वाढवण्यासाठी माजी सैनिकाची नियुक्ती केली जाणार आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी नऊ पथकांची स्थापना केली आहे.