गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या दोन्ही ठिकाणी भाजपला बहुमत मिळणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेबाहेर आले तेव्हा साहजिकच खुशीत दिसत होते. त्यांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांना पोझ देताना ‘व्हिक्टरी साईन’ दाखवले. संसदेच्या परिसरात आल्यानंतर मोदी आपल्या गाडीतून उतरले. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून त्यांनी नमस्ते म्हटले व ‘व्हिक्टरी साईन’साठी आपला हात उंचावला. गुजरातमध्ये भाजपने सलग चौथ्यांदा सत्ता कायम राखली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली. यामुळे भाजपची सत्ता असलेल्या राज्यांची संख्या १९ वर पोहोचणार आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील बहुतांश निकाल स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकणार आहे. यापैकी गुजरातमध्ये भाजपने १०५ जागांवर आघाडी मिळवली असून येथील पक्षाचा विजय जवळपास स्पष्ट आहे. तर राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली लढणारा काँग्रेस पक्ष ७२ जागांवर पुढे आहे. भाजप बहुमताच्या आकड्याजवळ पोहोचला असला तरी काँग्रेसच्या जागांमध्ये पूर्वीपेक्षा २० जागांची वाढ झाली आहे. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिल्यास काँग्रेस पक्षाच्यादृष्टीने हे मोठे यश म्हणावे लागेल.

एक्झिट पोल्सनी गुजरातमध्ये भाजपला मोठे यश मिळेल, असा अंदाज वर्तवला होता. उद्योगजगतानेही काहीसा असाच अंदाज बांधला होता. मात्र, मतमोजणीच्या सुरूवातीच्या टप्प्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. याचे पडसाद भांडवली बाजारातही उमटले होते. त्यामुळे सकाळच्या सत्रात सेन्सेक्स तब्बल ८०० अंकांनी कोसळला होता. मात्र, थोड्यावेळात भाजपने पुन्हा मुसंडी मारत १०० जागांवर आघाडी घेतल्यानंतर सेन्सेक्स पुन्हा २६७ अंकांनी वधारला होता.

Story img Loader