गुजरातमधल्या जुनागढ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका नवविवाहित दाम्पत्यामधला वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला आहे. पत्नीने पोलिसांत तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार दाखल करताना पत्नीने म्हटलं आहे की, तिच्या पतीने लग्नापासून आतापर्यंत वर्षभरात कधीही तिच्याबरोबर शारिरिक संबंध निर्माण केले नाहीत. माझा पती माझ्यापासून लांब पळतो, असं तिचं म्हणणं आहे.
या २३ वर्षीय महिलेने जुनागड पोलीस ठाण्यात जाऊन तिच्या पतिविरोधात तक्रार दाखल केली आहे. तिने तक्रारीत म्हटलं आहे की, गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ च्या फेब्रुवारीत तिचं लग्न झालं होतं. पोरबंदर येथे वाजत-गाजत तिचा विवाहसोबळा पार पडला होता. लग्नानंतर दोन आठवड्यात महिलेच्या लक्षात आलं की, तिच्या पतीला शारीरिक संबंध ठेवण्यात कोणताही रस नाही.
या पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे की, तिने अनेकदा पतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. परंतु ती प्रत्येकवेळी अपयशी ठरली. ती जेव्हा जेव्हा पतीच्या जवळ जात होती, तेव्हा तेव्हा तो तिच्यापासून दूर पळत होता. महिलेने म्हटलं आहे की, तिचं लग्न झालंय परंतु तिचा पती शारीरिक संबंध निर्माण करण्यात कधीच इच्छूक नसतो.
हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर जेव्हा या महिलेने तिच्या सासरकडच्या मंडळींना याबाबत सांगितलं तेव्हा तिच्या सासरकडचे लोक तिच्यावरच संतापले. तसेच याविषयी यापुढे कोणत्याही प्रकारची चर्चा करायची नाही, असं तिला बजावण्यात आलं. त्यानंतर ही गोष्ट तिच्या पतीला समजल्यावर त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
हे ही वाचा >> प्रवचन देणारा बुवा आयोजकाच्या पत्नीला घेऊन पसार; पोलिसांनी पकडल्यावर महिला म्हणाली…
या पीडित महिलेच्या सासरकडची मंडळी एवढ्यावरच थांबली नाही. त्यांनी या नवविवाहित महिलेवर चोरीचा आळ घेतला. महिलेची सासू तिच्याकडे हुंड्याची मागणी करत होती, तसेच सतत तिला यावरून टोमणे मारत होती. महिलेची सासू तिला म्हणायची की, तुझ्या बापाने लग्नात भंगार दिलंय. तसेच एकदा तिच्यावर २०० रुपये चोरल्याचा आरोप लावला. तिने या सगळ्याला कंटाळून विरोध केल्यानंतर तिच्या पतीने तिला जबर मारहाण देखील केली. तेव्हापासून ही महिला तिच्या माहेरी आई-वडिलांबरोबर राहत आहे.