Gujarat Man Arrested for Demolishing House of Wife’s Lover: गुजरातच्या भरूचमधील एका व्यक्ती त्याची पत्नी गावातील दुसऱ्या एक व्यक्तीसोबत पळून गेल्याच्या चर्चेमुळे संतापली होती. या संतापाच्या भरात त्याने पत्नीच्या कथित प्रियकराच्या घरावर थेट बुलडोझर फिरवला आहे. त्याने पत्नीच्या प्रियकाराशी संबंधित सहा घरांबाहेरील बांधकाम बुलडोझरने पाडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात आरोपीसह बुलडोझर चालक आणि त्याचा मालक यांसह इतर तिघांना अटक करण्यात आली आहे.
जंबुसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये आरोपी पतीने महेश फुलमाळी, या व्यक्तीच्या घराबाहेरील बांधकामावर बुलडोझर फिरवला आहे. महेश फुलमाळी हा करेली गावाचा रहिवासी आहे. त्याचे आरोपीच्या पत्नीशी कथित प्रमेसंबंध होता. दरम्यान आरोपीची पत्नी काही दिवसांपूर्वीच तिचे घर सोडून आनंद येथील तिच्या माहेरी गेली होती.
पण, आरोपीची पत्नी २१ मार्च रोजी तिच्या माहेरातूनही बेपत्ता झाली, त्यानंतर तिच्या वडिलांनी अंकलाव पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेच्या पतीला याबाबत कळवल्यानंतर, त्याने पत्नीचे महेश फुलमाळीबरोबर प्रमेसंबंध असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस फुलमाळीच्या घरी दाखल झाले तेव्हा त्यांना कळले की, फुलमाळीही गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे.
यानंतर संतपलेल्या आरोपी पतीने इतर पाच जणांना बरोबर घेत २१ मार्चच्या रात्रीच, बुलडोझर घेऊन फुलमाळीचे घर गाठले आणि घराचा भाग असलेले बांधकाम पाडले. तसेच त्याने फुलमाळीच्या शेजारी राहणाऱ्या त्याच्या पाच नातेवाईकांच्या घरांचाही काही भाग पाडले.
या घटनेनंतर महेश फुलमाळीच्या आईने २३ मार्च रोजी पोलीस ठाणे गाठले आणि या प्रकरणी तक्रार दाखल केली.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना वेदाचचे पोलीस निरीक्षक डी.एम. चौधरी म्हणाले, “आरोपींना घरे पाडण्याचा कोणताही अधिकार नव्हता. ते फुलमाळीच्या नातेवाईकांवर दबाव आणू इच्छित होते जेणेकरून त्यांना त्याचा आणि पत्नीचा ठावठिकाणा कळेल.”
दरम्यान, अंकलाव पोलीस महेश फुलमाळी आणि त्या महिलेचा शोध घेत आहेत. ते अद्याप बेपत्ता आहेत.