मस्करीची कुस्करी झाली, असे मराठीत म्हटले जाते. कधी कधी विनाविचार केलेली थट्टा-मस्करी कुणाच्या तरी अंगलट येऊ शकते. वास्तवाचे भान नसलेले अनेक उत्साही लोक नको ती मस्करी करतात आणि त्याला काही लोक बळी पडत असतात. गुजरातच्या मेहसाना येथे असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका चुलत भावाने आपल्याच भावाच्या गुदद्वाराजवळ उच्च हवेचा दाब असलेला कम्प्रेसर धरल्यामुळे शरीरात हवा घुसून एका तरुणाचा मृत्यू झाला. मृत झालेल्या तरुणाचे नाव प्रकाश असल्याचे समोर आले आहे.

नेमका प्रकार काय?

मृत तरूण प्रकाश हा त्याच्या भाऊ घेवाभाई आणि काही मित्रांसह चुलत भाऊ अल्पेश काम करत असलेल्या मेटल कारखान्यावर गेला होता. तिथे गेल्यावर सर्वजण निवांत गप्पा मारत असताना अल्पेशने उच्च हवेचा दाब असलेला पाईप प्रकाशच्या गुदद्वाराजवळ धरला. ज्यामुळे प्रकाशच्या शरीरात हवा भरली गेली. यानंतर प्रकाशला उलट्या सुरू झाल्या आणि तो बेशूद्ध पडला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथून त्याला अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. अहमदाबाद येथील रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी प्रकाशला मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश आणि त्याचा भाऊ २६ जानेवारी रोजी चुलत भाऊ काम करत असलेल्या कारखान्यावर गेले होते. प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्यामुळे सर्वांना मजा करायची होती. घेवाभाईने सांगितले की, उच्च हवेचा दाब असलेला पाईप किती घातक आहे, याची कल्पना अल्पेशला होती. तरीही त्याने प्रकाशच्या गुदद्वाराजवळ पाईप धरून हवेचा दाब सुरू केला.

घेवाभाईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. सदर प्रकार मस्करीतून झाल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

Story img Loader