गोमांस बाळगल्याच्या आरोपावरून गुजरातेत एका आरोपीला तीन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गणदेवीचे न्यायदंडाधिकारी सी.वाय.व्यास यांनी शुक्रवारी रफीर इलियासभाई खलिफा (वय ३५) याला तीन वर्षे तुरूंगवास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. गुजरात प्राणी संवर्धन सुधारणा कायदा २०११ मधील कलमानुसार त्याला दोषी ठरवण्यात आले होते. गुजरातेत मांस व त्यापासून बनवलेले पदार्थ विकत घेणे, विकणे व त्याची वाहतूक करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. निकाल देताना न्यायाधीशांनी सांगितले की, गायीचा संबंध हा एका समुदायाच्या धार्मिक भावनांशी निगडित आहे व अशा गुन्ह्य़ामुळे समाजातील शांतात धोक्यात येते. जर आरोपीला तुरूंगवास दिला तर पुन्हा असा गुन्हा करण्यास कुणी धजावणार नाही. आरोपी हा गरीब समाजातील आहे त्यामुळे त्याच्यावर दया करावी हा बचाव पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाने सांगितले की, आरोपी केवळ गरीब समाजातील आहे व त्याचे कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहे म्हणून त्याची शिक्षा कमी करता येणार नाही. आरोपी रफिक हा सुरत जिल्ह्य़ातील गणदेवी तालुक्यातील देवडा खेडय़ातील रहिवासी असून त्याला ८ ऑक्टोबर २०१४ रोजी अटक केली होती. गोसंरक्षण गटाच्या दोघांनी त्याला २० किलो गोमांस मोटरसायकलवरून नेताना पकडले होते व त्या मांसाची किंमत ४००० रुपये होती. गणदेवी पोलिसांनी मांसाचे नमुने तपासणीसाठी पाठवले ते गायीचे मांस असल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी गुजरात प्राणी संरक्षण कायदा ६ (बी) (१)(२)(३) ८(४) अन्वये गुन्हा दाखल केला होता. शिवाय कलम ४२९ म्हणजे प्राण्यांना ठार करून खोडसाळपणा करणे हाही गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने आरोपीला प्राणी संरक्षण सुधारणा कायदा २०११ अन्वये दोषी ठरवले. दुसरा आरोपी हनीफ युसूफभाई मामनियत हा खाटिक असून त्याला पुराव्याअभावी सोडण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा