गोव्याला पर्यटनासाठी आलेल्या एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुजरातच्या एका पर्यटकाला अटक केली आहे. उत्तर गोव्यातील असोनोरातील एका रिसॉर्टवर ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी (२५ ऑगस्ट) दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई केली. आरोपी ४७ वर्षीय असून लक्ष्मण शियार असं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुळचा गुजरातचा आहे. तोही पर्यटनासाठी गोव्याला आला होता. त्याची आणि पीडित महिलेची विमानातून येताना ओळख झाली. त्याने याच ओळखीचा फायदा घेत महिलेचा मोबाईल नंबर घेतला. पुढे दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी गेले. मात्र, २३ ऑगस्टला आरोपीने पीडित महिलेला फोन करून तो राहत असलेला रिसॉर्ट दाखवण्याचा बहाणा करत बोलावलं.
“रूम दाखवायला नेलं आणि बलात्कार केला”
पीडिता रिसॉर्ट पाहायला आल्यावर आरोपीने तिला त्याची रुम दाखवायला नेलं आणि तेथेच तिच्यावर बलात्कार केला. तसेच या प्रकाराबाबत कुणालाही सांगू नये असं धमकावलं.
हेही वाचा : ज्याला पकडायला सांगितलं त्याच मोबाईल चोराबरोबर महिला अधिकारी रंगेहाथ अटकेत, मुंबई पोलिसांची कारवाई
पीडितेने पोलीस तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी विविध पथकं तयार करत आरोपीचा शोध घेतला. तपासात आरोपी उत्तर गोव्यातील मापुसाजवळील एका गावात सापडला. घटना घडली ते असोनोरा गाव पणजीपासून ४० किलोमीटर अंतरावर आहे.