पीटीआय, अहमदाबाद : Gujarat Naroda village massacre गुजरात दंगलीदरम्यान घडलेल्या नरोदा गाम हत्याकांडप्रकरणी येथील विशेष न्यायालयाने सर्व ६७ आरोपींची गुरूवारी निर्दोष मुक्तता केली. भाजपच्या माजी आमदार माया कोदनानी, बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी, विश्व हिंदू परिषदेचे नेते जयदीप पटेल हे या खटल्यात प्रमुख आरोपी होते.
२००२मध्ये गोध्रा जळितकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीवेळी नरोदा गाम येथे मुस्लिमांची घरे पेटवून देण्यात आली होती. यामध्ये ११ मुस्लीम नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष तपास पथकामार्फत या प्रकरणाचा तपास करण्यात आला. गुजरात दंगलीच्या खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयामध्ये ५ एप्रिलला खटल्याची कार्यवाही संपली होती. न्यायाधीश शुभदा बक्षी यांनी गुरुवारी संध्याकाळी ५.३०च्या सुमाराला निकाल जाहीर केला. या गुन्ह्यामध्ये एकूण ८६ आरोपी होते. त्यातील १८ जणांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला होता तर एकाची यापूर्वीच मुक्तता करण्यात आली होती. उर्वरित ६७ आरोपी सध्या जामिनावर होते. या सर्वाची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. निकालानंतर न्यायालयात उपस्थित आरोपी, त्यांचे नातलग आणि समर्थकांनी न्यायालयाबाहेर ‘जय श्रीराम’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या.
नरोदा गाम खटल्यामध्ये १८२ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने कोदनानी आणि बजरंगी या दोघांनाही नरोदा पाटिया प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेप सुनावली होती. मात्र, गुजरात उच्च न्यायालयाने २०१८ मध्ये त्यांची सुटका केली. नरोदा गाम येथे झालेला हिंसाचार हा गुजरात दंगलीमधील सर्वाधिक भीषण नऊ घटनांपैकी एक होता. दररोज खटल्याचे कामकाज चालवण्याचा आदेश देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष न्यायालयासमोर हा खटला असला तरी त्याचा निकाल लागण्यास मात्र २१ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली.
पोलिसांची अनुपस्थिती
नरोदा गाममध्ये हिंसाचार सुरू झाला, त्यावेळी तेथे पोलिसांची उपस्थिती नव्हती, असे निरीक्षण गुजरात दंगलीचा तपास करणाऱ्या न्या. नानावटी आयोगाच्या अहवालामध्ये नोंदविण्यात आले आहे. पोलिस या भागात थेट संध्याकाळी पोहोचले. त्यांच्या अनुपस्थितीमुळे नरोदा गामची मुस्लीम कुटुंबे ही केवळ दंगेखोरांच्या दयेवर विसंबून होती, असे आयोगाने म्हटले आहे. मात्र येथून जवळ असलेल्या नरोदा पटिया येथे त्याच वेळी दंगल उसळल्यामुळे पोलिसांची मोठी कुमक तेथे पाठविण्यात आल्याचा खुलासा गृहखात्याच्या वतीने करण्यात आला होता.