विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री झाले. पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गुजरातच्या मंत्रिमंडळाचा संपूर्ण चेहराच बदलला. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या २१ जणांसह गुजरात मंत्रिमंडळात गुरुवारी २५ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. त्यात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या एकाही सहकाऱ्याचा समावेश नाही. दरम्यान गुजरातच्या नवीन मंत्रिमंडळातील किमान एक चतुर्थांश मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. तसेच २५ पैकी तीन चतुर्थांश मंत्र्यांची संपत्ती कोट्यावधीमध्ये आहे, असा दावा गुजरात इलेक्शन वॉच अँड असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने केला आहे.

इलेक्शन वॉचडॉगच्या ताज्या अहवालात म्हटलंय की, नवीन मंत्रिमंडळातील एकूण २५ मंत्र्यांपैकी सात मंत्री गुन्हेगारी प्रकरणात अडकलेले आहेत. यापैकी तिघांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच २५ पैकी १९ मंत्री करोडपती आहेत. गुन्हे दाखल असलेल्या मंत्र्यांमध्ये पटेल राघवजीभाई हंसराजभाई, अरविंदभाई गोरधनभाई राययानी, वाघाणी जितेंद्रभाई सावजीभाई आणि राजेंद्र त्रिवेदी यांचा समावेश आहे. तर, मंत्री परमार प्रदिपभाई खानाभाई, जितूभाई चौधरी आणि संघवी हर्ष रमेशकुमार यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. पटेल याच्या २५ जणांच्या मंत्रिमंडळात फक्त दोन महिला आहेत आणि सर्व मंत्र्यांची सरासरी मालमत्ता ३.९५ कोटी रुपये आहे.

सर्वाधिक मालमत्ता असलेले मंत्री विसनगर मतदारसंघातील पटेल ऋषिकेश गणेशभाई आहेत. त्यांची संपत्ती १४.९५ कोटी रुपये आहे. तर, सर्वात कमी घोषित मालमत्ता असलेले मंत्री मेहमदाबाद मतदारसंघातील चौहान अर्जुनसिंह उदेसिंह असून त्यांची संपत्ती १२.५७ लाख रुपये आहे. २५ पैकी १३ मंत्र्यांची शैक्षणिक पात्रता ८ वी ते १२ वी दरम्यान आहे. तर ११ मंत्र्यांनी त्यांची शैक्षणिक पात्रता पदवीधर किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचे जाहीर केले आहे. महत्वाचं म्हणजे एक मंत्री तर केवळ साक्षर आहे.

दरम्यान, एकूण १३ मंत्र्यांनी त्यांचे वय ३१-५० वर्षांच्या दरम्यान सांगितलंय. तर, १२ मंत्र्यांनी त्यांचे वय ५१-७० वर्षांच्या दरम्यान असल्याचं म्हटलंय.