गुजरातचे पेट्रोलियम मंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेत केलेल्या एका खुलाश्यामध्ये पेट्रोलची चोरी करणाऱ्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचा पर्दाफार्श केलाय. मंत्री मुकेश पटेल यांनी सर्वसामान्यांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावरील लाइनवर नंबर लावला. मात्र त्यांनी यावेळी हातचलाखीने लोकांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला रंगेहाथ पेट्रोल चोरी करुन जनतेला फसवताना पकडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूरतच्या जहांगीरपुरा परिसरामध्ये यश पेट्रोल पंप येथे पेट्रोलची चोरी केला जात असल्याची माहिती मुकेश पटेल यांना मिळाली होती. त्यानंतर ते स्वत: या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोहचले. मात्र संपूर्ण लवाजमा न घेऊन जाता ते सामान्य नागरिकाप्रमाणे गेले आणि त्यांना तेथील सत्य समजलं. त्यांनी पेट्रोल पंप सील करण्याचे आदेश देत तपास करण्यास सांगितलं आहे.

हा पेट्रोल पंप नुकताच सुरु झाला होता. त्यानंतर या पेट्रोल पंपासंदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या. दाखवण्यात येणाऱ्या प्रमाणापेक्षा प्रत्यक्षात पेट्रोल-डिझेल कमी देण्याची तक्रार अनेकांनी केलेली. या तक्रारींबद्दल जाणून घेण्यासाठी मुकेश पटेल स्वत: गाडी चालवत पंपावर गेले आणि गाडीमध्ये डिझेल टाकण्यास सांगितलं. मात्र सांगितलेल्या प्रमाणापेक्षा कमी डिझेल टाकल्याची शंका आल्याने पटेल यांनी पंपाच्या संचालकांना बोलवलं. त्यांच्याकडून स्कॉट मेन्टेन्सची नोंद वही मागवून घेतली.

मात्र रोज पंपावरील किती इंधन संपलं, किती उरलं यासंदर्भातील माहिती लिहिणं अपेक्षित असलेल्या या वहीत मागील तीन चार दिवसांपैकी एकाही दिवसाची नोंद नव्हती. हे पाहून पटेल यांना धक्काच बसला. पेट्रोल पंपाच्या संचालकांचा हा बेजबाबदारपणा पाहून पटेल यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना पेट्रोल पंपावर बोलवून घेतलं. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने स्थानिक प्रशासनाने अधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पंपावर पाठवून देत तपास सुरु केला. प्राथमिक तपासामध्ये इंधन जिथून टाकीमध्ये पडतं ते नोजल चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आल्याने कमी इंधन दिलं जात असल्याचं स्पष्ट झालं.

अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती देताना रविवारी रात्री उशीरा पटेल हे त्यांच्या विधानसभा मतदारसंघामधील नियारा पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी तिथे बोर्ड का लावण्यात आले नाही असं विचारलं असता दुसऱ्या बाजूला बोर्ड लावल्याचं सांगण्यात आलं.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना मुकेश पटेल यांनी, “पेट्रोलवरील अधिभार कमी झाल्यानंतर अनेक पेट्रोल पंपचे मालक फसवणूक करत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या. माझ्या घरापासून जवळच एक पंप आहे. मात्र एक दुसरी खासगी कार घेऊन मी दुसऱ्या पंपावर सत्यता पडताळून पाहण्यासाठी गेलो तर तिथे फसवणूक केली जात असल्याचं माझ्या लक्षात आलं. कर्मचाऱ्याने १२ मिली लीटर पेट्रोल कमी भरलं होतं. मी त्या पंपावरील इंधनही लॅब टेस्टसाठी पाठवण्याचे आदेश दिलेत,” असं पटेल म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat petrochemicals minister mukesh patel reached petrol pump like a common man caught fraud jahangirpura area surat scsg