महात्मा गांधी यांचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदर या गावी गाईंसाठी अभयारण्य उभारण्याचा विचार गुजरात सरकार करीत आहे. गाईंवर आधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न यामागे आहे. गुजरातेत गोहत्या बंदी कायदा काटेकोरपणे राबवला जात आहे व आताची योजना तडीस गेली तर मध्य प्रदेशनंतर गाईंसाठी अभयारण्य सुरू करणारे गुजरात हे दुसरे राज्य ठरणार आहे. गुजरात राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष वल्लभ कठिरिया यांनी म्हटले आहे की, पोरबंदर जिल्ह्य़ातील रणवाव खेडय़ात धरमपूर खेडय़ात गाईंचे हे अभयारण्य तयार करण्यात येणार आहे. नियोजित अभयारण्य ८००-९०० हेक्टर जमिनीवर साकारले जाणार असून वेगवेगळ्या प्रजातीच्या १०००० गाईंना तेथे सामावून घेतले जाईल. गाईंच्या या अभयारण्यासाठी जमीन संपादन करण्यात आली असून प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी सल्लागारांची समिती नेमली आहे, त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर काम सुरू केले जाईल.  
कठिरिया हे माजी केंद्रीय राज्य मंत्री असून त्यांनी सांगितले की, सुरूवातीच्या काळानंतर तेथे एक संशोधन केंद्रही सुरू  केले जाईल. गाईंवर आधारित अर्थव्यवस्थेला चालना देणे हा उद्देश आहे. गाईचे दूध, शेण, मूत्र यापासून अनेक उत्पादने तयार करता येतील. सरकार यात मंगलम योजनेतील महिलांना सहभागी करून त्यांना उपउत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण देणार आहे. गाईच्या शेणापासून खत तयार केले तर युरियाच्या आयातीचा खर्च कमी होईल व त्यामुळे भारतात खतांवरील अनुदानाचे १.४५ लाख कोटी रूपये वर्षांला वाचतील. सध्या युरियाचे एक पोते १३०० रूपयांना मिळते. गाईच्या जैव खतांची किंमत ३०० रू. पोते असेल. या प्रकल्पासाठी चालू आर्थिक वर्षांत १ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे, ती दरवर्षी वाढवत नेली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा