Gujarat Police SIT arrested former IPS officer Sanjiv Bhatt: गुजरात दंगल प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मागील काही दिवसांमध्ये अटकसत्र सुरु आहे. याचदरम्यान मंगळवारी रात्री उशीरा अहमदाबाद पोलिसांनी सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करुन तीन लोकांना अटक केली आहे. यामध्ये मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि माजी पोलीस महासंचालक आर. बी. श्रीकुमार यांच्यानंतर आता अहमदाबाद पोलिसांनी बडतर्फ आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना अटक केली आहे. मागील बऱ्याच काळापासून पालनपूर तुरुंगामध्ये अटकेत असणाऱ्या भट्ट यांना अहमदाबाद पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतलं.

नक्की वाचा >> विश्लेषण : तिस्ता सेटलवाड, बी. श्रीकुमार, संजीव भट्ट यांच्या चौकशीसाठी गुजरात एसआयटी कशासाठी?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालनपुर तुरुंगामध्ये संजीव भट्ट यांना ताब्यात घेण्यासंदर्भातील कागदोपत्री पूर्ततांनंतर अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेची तुकडी त्यांना अहमदाबादमध्ये घेऊन गेली. भट्ट यांना अटकेत असताना एका गुन्हेगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी दोषी ठरवत शिक्षा सुनावली असून याच प्रकरणामध्ये ते तुरुंगात आहे. आता या प्रकरणानंतर गुजरात दंगल प्रकरणात भट्ट यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार ट्रान्सफर वॉरंटअंतर्गत ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगल प्रकरणामध्ये निर्दोष लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ही अटक झाल्याचं सांगण्यात आलंय.

प्रकरण काय?
गोधरा जळितकांडानंतर २००२ मध्ये गुजरातमध्ये दंगल उसळली होती. त्यात अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीतील काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांच्यासह एकूण ६९ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पंतप्रधान मोदी तसेच आणखी ६३ जणांना एसआयटीने (विशेष तपास पथक) निर्दोषत्व किंवा क्लीन चिट दिली होती. २००२मधील गुजरात दंगल हे मोठे षड्यंत्र असून त्यासंदर्भात पुन्हा चौकशी व्हावी अशी याचिका अहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेत तिस्ता सेटलवाड सहयाचिकाकर्त्या आहेत. झाकिया जाफरी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली असून एसआयटीचा अहवाल कायम ठेवला आहे. न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल्या क्लीन चिटनंतर आता गुजरात एसआयटीने तिस्ता सेटलवाड यांना मुंबईत त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सेटलवाड यांचे नाव घेल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, असे मानले जात आहे.

या प्रकरणी एसआयटीने त्यांच्यासह कोणाकोणावर आणि कोणते गुन्हे दाखल केले आहेत?

पोलिसांनी या प्रकरणात तिस्ता सेटलवाड यांच्याशिवाय मूळ प्रकरण उघडकीस आणणारे ‘व्हिसल ब्लोअर’ मानले जाणारे माजी आयपीएस अधिकारी आर. बी. श्रीकुमार यांना नुकतीच अटक केली आहे. गुजरात दंगलींबाबत चुकीची माहिती दिल्याचा आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्याबरोबरच बडतर्फ आयपीएस अधिकारी संजीव भट्ट (हे २० जून २०१९ पासून तुरुंगात आहेत) आणि तिस्ता सेटलवाड अशा तिघांवर कलम ४६८ (फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटेपणा करणे), कलम ४७१ (जाणीवपूर्वक खोटी कागदपत्रे ), कलम १९४ (खोटे पुरावे देणे किंवा बनवणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबरोबरच त्यांच्यावर कलम २११ (दुखापत करण्याच्या उद्देशाने गुन्ह्याचा खोटा आरोप करणे), कलम २१८ (सरकारी अधिकाऱ्याने चुकीच्या नोंदी करणे), आणि कलम १२० ब (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat police sit has arrested former ips officer sanjiv bhatt scsg
Show comments