गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल सोमवारी म्हणजेच १८ डिसेंबरला लागणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर पाटीदार समजाचा नेता हार्दिक पटेल याने भाजपवर टीका केली आहे. शनिवार आणि रविवार म्हणजेच आज आणि उद्या रात्री भाजप इव्हीएममध्ये घोटाळा करण्याच्या तयारीत आहे आणि हा घोटाळा करुन त्यांना गुजरातची निवडणूक जिंकायची आहे असा गंभीर आरोप हार्दिक पटेलने केला. या संदर्भातला एक ट्विटच हार्दिक पटेलने केला आहे. जर भाजपने गडबड-घोटाळा केला नाही तर त्यांना सरासरी ८२ जागा मिळण्याची शक्यता आहे असेही हार्दिक पटेलने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
शनिवार और रविवार की रात को EVM में बड़ी गरबडी करने जा रही है भाजपा,
चुनाव हार रही हैं भाजपा,EVM में गरबडी नहीं होंगी तो ८२ सीट भाजपा को मिल रही है।— Hardik Patel (@HardikPatel_) December 16, 2017
एवढेच नाही तर इव्हीएमचा घोटाळा करून भाजप गुजरात विधानसभा निवडणूक जिंकेल मात्र हिमाचलमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागेल असेही हार्दिक पटेलने म्हटले आहे. गुजरातमध्ये भाजपचा पराभव म्हणजे त्यांचे नाक कापले जाईल आणि त्यांच्या ऱ्हासाची सुरुवात तिथूनच होईल असेही हार्दिक पटेलने म्हटले आहे. त्यामुळे इव्हीएमचा घोळ घालून भाजप गुजरातची निवडणूक जिंकेलच असा आरोप हार्दिक पटेलने केला.
गुजरात में भाजपा की हार का मतलब है भाजपा का पतन
EVM में गरबडी करके भाजपा गुजरात चुनाव जितेगी और हिमाचल प्रदेश का चुनाव हारेंगी,ताकि कोई प्रश्न ना उठाए— Hardik Patel (@HardikPatel_) December 16, 2017
गुजरात निवडणुकांच्या रणधुमाळीत पाटीदार आरक्षणाच्या मुद्द्यावरून हार्दिक पटेलने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातच दंड थोपटले. तर भाजपच्या नेत्यांनी कथित सेक्स सीडी पुढे आणून हार्दिक पटेलच्या विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला. आता या सगळ्याचा परिणाम काय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गुजरातच्या जनतेने त्यांचा कौल मतपेटीत बंद केला आहे. गुजरातमध्ये नेमके काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अनेक एग्झिट पोल्सनी भाजपचीच सत्ता येईल असे म्हटले आहे.
गुजरातची विधानसभा निवडणूक हा भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे १८ डिसेंबरच्या निकालाकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे. अशात आता इव्हीएममध्ये घोटाळा करुन भाजप जिंकणार असा गंभीर आरोप हार्दिक पटेलने केला आहे. या आरोपांना पंतप्रधान किंवा इतर भाजप नेते कशाप्रकारे उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.