अहमदाबाद : गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. राज्य आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार बलसाड आणि नवसारी जिल्ह्यांतील काही भागांत रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत अत्यंत मुसळधार पाऊस झाला. पावसाशी संबंधित दुर्घटनांत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक गावे जलमय झाल्याने व रस्ते पाण्याखाली गेल्याने तेथील संपर्क तुटला आहे. येथे अडकलेल्या पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून (एसडीआरएफ) दिवस-रात्र मदतकार्य सुरू माहिती त्यांनी दिली. सध्या जामनगर हा सर्वात जास्त प्रभावित जिल्ह्यांपैकी एक आहे. पोलिसांनी सांगितले, की शुक्रवारपासून पावसाशी संबंधित दुर्घटनांत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात सरासरी ३२ मिमी पाऊस झाला.

अमित शहांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, गुजरात सरकार मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शाह यांनी ‘ट्वीट’ केले. की गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती झाली आहे. पूरबाधितांना सुरक्षितस्थळी हलवणे, त्यांना आश्रय, अन्नधान्य पुरवठय़ासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी बोलून परिस्थिती जाणून घेतली. केंद्र व राज्य आपत्ती व्यवस्थापन पथके व स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून हे मदतकार्य सुरू आहे. या कठीण प्रसंगी केंद्र व राज्यसरकार गुजरातवासीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat rains 11 dead flood like situation in several areas of gujrat zws
Show comments